नागपूर जिल्ह्यातील भानेगावात भोंदूबाबाचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:18 PM2018-07-20T23:18:25+5:302018-07-20T23:20:15+5:30
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ येत असताना काही मंडळी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात. खापरखेडा पत्रकार संघ व अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी भानेगाव येथील एका भोंदूबाबाची चित्रफित तयार करून ती पोलिसांना दाखविली. त्याआधारे खापरखेडा पोलिसांनी भोंदूबाबाचा भंडाफोड करीत त्याला अटक केली. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून शस्त्र व विविध साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ येत असताना काही मंडळी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करतात. खापरखेडा पत्रकार संघ व अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी भानेगाव येथील एका भोंदूबाबाची चित्रफित तयार करून ती पोलिसांना दाखविली. त्याआधारे खापरखेडा पोलिसांनी भोंदूबाबाचा भंडाफोड करीत त्याला अटक केली. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून शस्त्र व विविध साहित्य जप्त केले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
संदीप प्रभूदास शिडाम (२८, रा. भानेगाव, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याच्या घरून तीन तलवारी, कट्यार, चार चाकू, खंजर, मोठी नागकाठी, पाच अंगठ्या, दोन मोबाईल, दोन कडे, ५० लिंबं, राख, रुद्राक्ष माळ, सट्टापट्टी नंबर, मजकूर लिहिलेले लहान मुलांचे पासपोर्ट फोटोसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
तो दोन वर्षांपासून भोंदूगिरी करीत होता. दरम्यान, दिलीप गणपत खारकर (५५, रा. खापरखेडा, ता. सावनेर) यांच्या पत्नीची प्रकृती खराब असल्याने तसेच औषधांनी आराम मिळत नसल्याने मित्रांच्या सांगण्यावरून त्यांनी पत्नीला भोंदूबाबा संदीपकडे त्याच्या घरी नेले होते. त्याने दिलीपच्या पत्नीच्या अंगावरून राखेची पुडी, भस्म, लिंबू ओवाळून बाहेर फेकले आणि तिला एका व्यक्तीने बाहेरचे लावल्याचे सांगून तलवार व कट्यार दाखवून त्यांच्या मनात भीती निर्माण केली. शिवाय, तिची प्रकृती बरी होणार असल्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून महिनाभरात ५० हजार रुपये उकळले.
प्रकरण पोलिसात पोहोचताच पुरावे गोळा करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक अशोक साखरकर यांनी पोलीस शिपाई प्रिया महल्ले व जितेश झडाने यांच्यावर सोपविली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शेखर कोलते व पत्रकार संघाच्या सदस्यांनाही सोबत घेतले. प्रिया महल्ले यांनी आजारपणाचे नाटक केले तर, संदीपने तिच्यावर मंत्रोपचार केले. या प्रकाराची चित्रफित तयार करण्यात आली. त्या आधारे त्याच्या घरी धाड टाकून त्याला अटक केली.
त्याला सावनेर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
संदीपने दिली धमकी
पत्नी बरी होत नसल्याचे दिलीप यांनी भोंदूबाबा संदीपच्या निदर्शनास आणून दिले. सुरुवातीला त्याने न घाबरण्याचा सल्ला दिला. नंतर मात्र संदीपने दिलीप यांना अश्लील शिवीगाळ करीत त्यांना तुझ्याने जे जमते ते करून घे, अशी धमकी दिली. दिलीपने ही बाब पत्रकार संघाच्या सदस्यांना सांगितली व पोलिसात तक्रार नोंदविली.