भुवनेश्वरी एस. यांनी स्मार्ट सिटीचा पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 12:15 PM2020-10-29T12:15:23+5:302020-10-29T12:25:56+5:30
Nagpur News नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार भुवनेश्वरी एस. यांनी बुधवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडून स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार भुवनेश्वरी एस. यांनी बुधवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडून स्वीकारला. त्यानंतर भुवनेश्वरी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली.
भुवनेश्वरी एस. या मूळ तामिळनाडूच्या रहिवासी असून वर्ष २०१५ च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकारी आहेत. यापूर्वी त्या भंडारा व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी शासनाकडून डॉ. रामनाथ सोनावणे यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये त्यांची महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये सचिव पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे सीईओ पदाचा प्रभार सोपविण्यात आला होता. भुवनेश्वरी यांचे स्वागत मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, महाप्रबंधक राजेश दुफारे, डॉ. शील घुले यांच्यासह विभागातील अधिकाऱ्यांनी केले.