भुजबळ-पटोले-वडेट्टीवार हे तर ’हेराफेरी’तील कलावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:06 AM2021-06-19T04:06:48+5:302021-06-19T04:06:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हेराफेरी केली असून छगन भुजबळ, नाना पटोले आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हेराफेरी केली असून छगन भुजबळ, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे ‘हेराफेरी’ या चित्रपटातील कलावंत आहेत, अशी टीका माजी मंत्री व भाजपचे नेते ॲड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रपरिषद घेऊन केली. तसेच हेराफेरी चित्रपटातील बाबूभय्या, श्याम व राजू हे या तिघांपैकी नेमके कोण? हे मात्र त्यांनीच सांगावे असा चिमटाही शेलार यांनी काढला.
भंडारा व वर्धा येथील दौऱ्यानंतर शेलार यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रपरिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हेराफेरी केली आहे. छगन भुजबळ, नाना पटोले व विजय वडेट्टीवार हे तीन दिग्गज नेते राज्यातील आघाडी सरकारमधील महत्त्वाचे अंग आहेत. परंतु ते सरकारच्या बैठकीत वेगळे आणि बाहेर वेगळे बोलतात. फडणवीस यांनी टिकवलेले ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारला का टिकविता आले नाही. फडणवीस यांनी आरक्षणाबाबत जीआर काढला तो व्यपगत का करण्यात आला. राज्य मागासवर्ग आयोग स्थाापण्यास १४ ते १५ महिन्याचा वेळ का लागला. इंपेरिकेबल डाटा न्यायालय मागत असताना राज्य सरकारने काय केले? असा प्रश्नही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम,, अर्चना डेहनकर, चंदन गाेस्वामी, सुनील मित्रा आदी उपस्थित होते.
बॉक्स
विकास गवळी व रमेश डोंगरे यांच्याशी काँग्रेसचा संबंध काय?
ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत याचिका दाखल करणारे विकास गवळी व रमेश डोंगरे यांच्याशी काँग्रेसचा संबंध काय, असा प्रश्नही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, आमच्या माहितीनुसार गवळी हे वाशीम येथील काँग्रेसच्या माजी आमदाराचे पुत्र आहे. यापैकी एक जण नाना पटोले यांचे खास आहेत. तेव्हा काँग्रेसनेच यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे.