भुजबळ, वडेट्टीवार ओबीसीमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत; बबनराव तायवाडेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 07:38 PM2024-01-30T19:38:15+5:302024-01-30T19:39:06+5:30

ओबीसी जनगणनेसाठी काढणार जनजागृती यात्रा

Bhujbal, Vadettiwar creating misunderstanding among OBCs; Criticism of Babanrao Taiwade | भुजबळ, वडेट्टीवार ओबीसीमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत; बबनराव तायवाडेंची टीका

भुजबळ, वडेट्टीवार ओबीसीमध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत; बबनराव तायवाडेंची टीका

नागपूर : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या आंदाेलनानंतर राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय केलेला नाही. त्यामुळे राज्याचे मंत्री छगन भूजबळ व विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजामध्ये गैरसमज निर्माण करीत आहेत, असा आराेप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांनी केला.

मंगळवारी एका पत्रपरिषदेत प्रा. तायवाडे यांनी सरकारने ओबीसींर अन्याय न करण्याचा शब्द दिला आहे व त्याचे समर्थन करीत असल्याचे सांगितले. त्यांच्या मते महसुली प्रमाणपत्रांमध्ये ज्यांच्या मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नाेंदी आहेत, त्यांचाच ओबीसी प्रवर्गात समावेश हाेणार आहे. वास्तविक म्हणजे ओबीसी समाजामध्ये ४०० जातींचा समावेश आहे. महसुली प्रमाणपत्रांमध्ये ज्या नाेंदी सापडत आहेत, त्या आधीपासूनच आहेत व ते सवलतींचा लाभ घेणारेच आहेत. नागपूर जिल्ह्यात २ लाख ९० हजार किंवा विदर्भातील ९ लाखांच्यावर सापडलेल्या नाेंदी जुन्याच आहेत व नव्याने ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा विषय नाही. मात्र राज्यातील नेत्यांकडून २ काेटी मराठ्यांचा नव्याने समावेश करण्यात येत असल्याचा संभ्रम पसरविला जात आहे. त्यांनी गैरसमज पसरविणे बंद करावे, असे आवाहन करीत या नेत्यांना भेटणार असल्याचे प्रा. तायवाडे यांनी स्पष्ट केले.

‘सगेसाेयरे’ बाबतचा प्रश्नही महत्त्वाचा नसल्याचे ते म्हणाले. आपल्या देशात मातृसत्ताक पद्धत नाही व पितृसत्ताक पद्धतीनुसार आलेल्यांना लाभ मिळणे क्रमप्राप्त असल्याचे ते म्हणाले. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश हाेऊ शकत नाही. यापूर्वी सहा आयाेगांनी त्यावर शिक्कामाेर्तब केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजू चाैधरी, उज्ज्वला बाेढारे, लीलाधर लाभे, युवा अध्यक्ष अनिल चानपूरकर, रामकृष्ण माेरे, शरद वानखेडे आदी उपस्थित हाेते.

ओबीसींची जनगणना करावी

केंद्र व राज्य सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी घाेषित करावी, केंद्रामध्ये ओबीसींकरीता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसी समाजावर लावलेली क्रिमिलेयरची अट रद्द करावी, रिक्त पदांचा अनुशेष भरावा, व्यावसायिक, अव्यावसायिक शिक्षणसंस्थामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के सवलत लागू करावी, आदी मागण्यांसाठी ३१ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात नागपूर जिल्ह्यात जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रा. तायवाडे यांनी दिली. बुधवारी दीक्षाभूमी येथून सकाळी ९ वाजता यात्रेला सुरुवात हाेणार असून जिल्ह्यात सर्वत्र फिरत, सभा घेत ५ फेब्रुवारीला कामठी येथे सभा हाेणार आहे.

Web Title: Bhujbal, Vadettiwar creating misunderstanding among OBCs; Criticism of Babanrao Taiwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.