३०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांचे जानेवारीत भूमिपूजन
By admin | Published: December 20, 2015 02:57 AM2015-12-20T02:57:02+5:302015-12-20T02:57:02+5:30
शहरातील रस्त्यांची दरवर्षी दुरुस्ती करण्याऐवजी कायमस्वरूपी सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.
स्थायी समितीची मंजुरी : लघु निविदा काढण्याचा निर्णय
नागपूर : शहरातील रस्त्यांची दरवर्षी दुरुस्ती करण्याऐवजी कायमस्वरूपी सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार या रस्त्यांच्या ३०० कोटींच्या निविदा काढण्याला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत हा निर्णय अडकला होता. परंतु निवडणूक बिनविरोध झाल्याने आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याने गुरुवारी समितीच्या बैठकीत निविदा काढण्याला मंजुरी देण्यात आली.
सिमेंट रस्त्यांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी. यासाठी २५ दिवसांची लघु निविदा काढण्यात येणार असून जानेवारी २०१६ मध्ये रस्त्यांचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली.
शहरातील ५५ रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. यावर राज्य सरकार व नासुप्र प्रत्येकी १०० कोटी तर महापालिका १२४ कोटींचा निधी खर्च करणार आहे. रस्त्यांचा प्रस्ताव मूळ ३०० कोटींचाच होता. परंतु कामाला विलंब झाल्याने खर्चात वाढ झाली आहे. हा अतिरिक्त बोजा महापालिकेला उचलावा लागणार आहे. (प्रतिनिधी)