इंदू मिलच्या स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबरपूर्वी
By admin | Published: April 19, 2015 02:19 AM2015-04-19T02:19:47+5:302015-04-19T02:19:47+5:30
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबर महिन्यात..
नागपूर : मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन आॅक्टोबर महिन्यात म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिन वर्धापनदिनापूर्वी करण्याचा सरकारचा मानस आहे, असे सामाजिक न्यायखात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष सामाजिक समता वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती बडोले यांनी दिली. मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाकडे त्यांचे लक्ष वेधले असता बडोले म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर या प्रक्रियेला गती आली आहे. जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आॅक्टोबरपर्यंत म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या वर्धापनदिनापूर्वी भूमिपूजन करण्याचा सरकारचा मानस आहे. काँग्रेसने इंदू मिलमध्ये केलेल्या प्रतिकात्मक भूमिपूजनासंदर्भात बडोले म्हणाले की, काँग्रेसकडून हा श्रेय लाटण्याचा प्रकार आहे.स्मारक व्हावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.(प्रतिनिधी)
सामाजिक समता वर्ष
सामाजिक समता वर्षाच्या निमित्ताने विविध योजना राबविण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपातही पारदर्शकता आणण्यात येईल. ज्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळत नाही त्यापैकी काहींचा विचार शिष्यवृत्तीसाठी केला जाईल. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान वाटप बायोमेट्रिक पद्धतीने केले जाईल आणि जात वैधता प्रमाणपत्राचे कक्ष प्रत्येक जिल्ह्यात या महिन्यात सुरू होईल, असे बडोले म्हणाले.
लंडनमध्ये होणार स्मारक
लंडनमध्ये ज्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते ते घर खरेदी करून तेथे स्मारक उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बडोले यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती २३ ला लंडनला जाणार आहे. यासंदर्भात माहिती देताना बडोले म्हणाले की, येथे संग्रहालय आणि वाचनालय सुरू करण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर स्थापन करणे, त्याचप्रमाणे आंबेडकर यांच्या नावाने फेलोशिप सुरू करण्यात येणार असून, लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा सरकारचा मानस आहे. या घराची किंमत सरासरी ४० कोटी ठरण्याची शक्यता आहे. यासाठी सॉलिसिटरची नियुक्ती करण्यात आली आहे. तेथे स्मारक उभारल्यावर त्याची देखभाल- दुुरुस्ती कोणी करावी, यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर लंडनमध्ये गेल्यावर चर्चा केली जाईल.