दिलीप कुमार यांच्या हस्ते झाले होते वाकी दरबारचे भूमीपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 10:56 AM2021-07-08T10:56:38+5:302021-07-08T10:59:16+5:30

Nagpur News आपल्या अभिनयाव्यतिरिक्त वक्तृत्व अदायगीने कित्येक स्मृती नागपूरकरांच्या हृदयात कोरून ठेवल्या. त्यातीलच एक प्रसंग म्हणजे वाकी दरबारच्या भूमिपूजनाचा होय.

Bhumi Pujan of Waki Darbar was performed by Dilip Kumar | दिलीप कुमार यांच्या हस्ते झाले होते वाकी दरबारचे भूमीपूजन

दिलीप कुमार यांच्या हस्ते झाले होते वाकी दरबारचे भूमीपूजन

googlenewsNext
ठळक मुद्देअपघाताच्या वृत्ताने वाढवली होती धाकधूक!

 

प्रवीण खापरे

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वेदनेचा राजा अर्थात ‘ट्रॅजेडी किंग’ अशी रसिक पावती मिळविणारे दिलीप कुमार उपाख्य युसुफ खान यांचे चाहते सर्वत्र होते आणि आहेत. खासगी विवाह सोहळ्यात असो, श्री साई बाबा मंदिराच्या जमिनीच्या खरेदीसाठी दानदात्यांचा सोहळा असो वा प्रसिद्ध शायर डॉ. मन्शा यांच्या सत्कारासाठी असो, तीन-चारदा ते नागपूरला येऊन गेले. आले आणि प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या अभिनयाव्यतिरिक्त वक्तृत्व अदायगीने कित्येक स्मृती नागपूरकरांच्या हृदयात कोरून ठेवल्या. त्यातीलच एक प्रसंग म्हणजे वाकी दरबारच्या भूमिपूजनाचा होय. दिलीप कुमार वेळेवर पोहोचले नाहीत आणि दरम्यान अपघाताचे वृत्त हाती आले. नेमके काय घडले, कसे घडले या चिंतेने उपस्थित श्रोत्यांमध्ये धाकधूक वाढायला लागली होती.

तत्कालीन खासदार एन.के.पी. साळवे यांचे दिलीप कुमार यांच्याशी घनिष्ट संबंध होते. त्यांच्याच प्रयत्नातून दिलीप कुमार प्रसिद्ध शायर डॉ. मन्शा यांच्या सत्कारासाठी नागपूरला आले होते. हा कार्यक्रम २२ फेब्रुवारी १९९१ रोजी डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात रात्री ९ वाजता होणार होता. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरपासून जवळच असलेल्या वाकी येथे हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या दरबाराचा भूमिपूजन सोहळा दिलीप कुमार यांच्याच हस्ते करण्याचे नियोजन होते. त्या अनुषंगाने सकाळी ९ वाजता भूमिपूजन पार पडणार होते. कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली. लोकही मोठ्या संख्येने पोहोचले. त्या वेळी आजच्यासारखे मोबाइलही नव्हते. त्यामुळे करंट हॅपनिंग कळत नव्हती.

दरम्यान, सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपूरचे तत्कालीन महापौर वल्लभदास डागा, माजी महापौर पांडुरंग हिवरकर घटनास्थळी पोहोचले. मात्र, दिलीप कुमार येईनात. त्यामुळे नागरिक प्रचंड वैतागले होते आणि निराशाही व्यक्त करीत होते. अशात एक नकोसे वृत्त नागरिकांच्या कानी पडले... कोराडी येथे भयंकर अपघात झाला. मात्र, कोणाचा..? कसा..? हे काहीच कळेना. अनेकांच्या मनात गैरसमज, चिंता निर्माण होऊ लागल्या. मात्र, अर्ध्या तासातच तो अपघात दुसऱ्या कुणाचा तरी असल्याचे वृत्त धडकले. मात्र, अपघातामुळे स्थानिकांनी रस्ता अडवून धरल्याने पाहुणे अर्थात दिलीप कुमार अडकले असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यामुळे, कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास त्यांना किती उशीर लागेल, हे अवघड असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता दिलीप कुमार पत्नी सायरा बानो व खा. एन.के.पी. साळवे यांच्यासोबत कार्यक्रमस्थळी दाखल झाले. कार्यक्रम आटोपल्यावर सगळा प्रकार उघडकीस आला.

माणसामाणसांत फूट पाडणाऱ्यांपासून केले होते सावध

माणसाच्या मनात द्वेषाची भावना पसरवली जात आहे. मेंदू विभागला जात आहे. हे काम फुटीरवादी प्रवृत्ती करीत आहेत. केवळ फूट पाडणे हेच त्यांचे काम असून, अशांपासून सावध राहण्याचे आवाहन दिलीप कुमार यांनी भूमिपूजन प्रसंगी केले होते.

मोठा ताजबागचे दर्शन

दिलीप कुमार जेव्हा जेव्हा नागपूरला येत, तेव्हा तेव्हा ते मोठा ताजबाग येथे जाऊन ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्याचे दर्शन घेत व समाधीवर माथा टेकून चादर चढवत असत.

......

Web Title: Bhumi Pujan of Waki Darbar was performed by Dilip Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.