भूषणकुमार उपाध्याय नागपूरचे नवे पोलीस आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:18 AM2018-07-31T10:18:44+5:302018-07-31T10:19:38+5:30
नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तर, येथील पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाल्याचे वृत्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तर, येथील पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाल्याचे वृत्त आहे. गृहमंत्रालयातून तशा प्रकारचे सोमवारी दुपारी आदेश जारी झाले.
१९८९ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. उपाध्याय सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कारागृह, सुधारणा व पुनर्वसन ही जबाबदारी सांभाळत आहेत. मितभाषी, सकारात्मक विचारसरणी आणि दूरदर्शी निर्णय घेणारे अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. उपाध्याय यांनी यापूर्वी नागपुरात पोलीस उपायुक्त (वाहतूक), नागपूर ग्रामीणचे अधीक्षक, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह आदी महत्त्वपूर्ण पदावर काम केले आहे. येथे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी ‘मिशन मृत्यूंजय’ हा अभिनव उपक्रम राबवून उपराजधानीतील एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शहर पोलिसांसोबत जोडले होते. सतर्क राहा, जागरूक राहा, असा संदेश देत त्यांनी कुठे काही संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवा, हा मंत्र देऊन नागरिकांना पोलीस मित्र बनविले होते. त्यांची ही संकल्पना नंतर राज्य पोलीस दलात सर्वत्र राबविण्यात आली. सामाजिक एकोपा निर्माण करण्याचे त्यांचे कौशल्य आणि भाषामाधुर्य त्यांचे पुन्हा एक वैशिष्ट्य आहे. ते चांगले लेखकही आहेत. कोणत्याही गुन्ह्याचा छडा लावण्याचे त्यांचे कसब आणि पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्याची त्यांची शैलीही सर्वत्र परिचयाची आहे. नागपुराते गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त असताना लखोटिया बंधू हत्याकांड घडले होते. लाखोंची हवालाची रोकड लुटण्यासाठी बच्चा कुशवाह नामक उत्तर प्रदेशातील कुख्यात सुपारी किलरने लखोटिया बंधूंवर अंधाधुंद गोळ्या झाडल्या होत्या, त्यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला होता. या हत्याकांडाचा छडा लावत उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना हुडकून त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून करवून घेतली होती.
कारागृहाच्या नागपूर विभागाचे विशेष महानिरीक्षक म्हणून त्यांनी एवढे चांगले काम केले की सर्वसामान्य नागपूरकर नव्हे तर कैदीही त्यांच्या प्रेमात पडले होते. त्यांची तेथून बदली झाल्यानंतर ही बदली रद्द व्हावी म्हणून नागपूर-अमरावतीच्या कैद्यांनी आठवडाभर आमरण उपोषण केले होते. नागपूर-विदर्भात त्यांचे जोरदार नेटवर्क असून, त्यामुळे नागपूरची गुन्हेगारी कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास नागपूरकरांना वाटत आहे.
नागपूरची पुलिसिंग राज्यातच नव्हे तर सर्वत्र मॉडेल ठरेल, असे आपले प्रयत्न राहील. त्यादृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करू. त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आणि उपाययोजना करणार.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय,
नवे पोलीस आयुक्त
नागपूरकरांनी भरभरून प्रेम दिले, विश्वास दिला, त्यामुळेच नागपुरातील पोलीस दलाला चांगले काम करता आले. गुन्हेगारी कमी करून नागरिकांना पोलिसांशी जोडण्याची किमया साधता आली. आपल्या आयुष्याच्या कारकीर्दीत नागपूरचा अनुभव मोलाचा राहिला आहे. सर्वांचे मनापासून आभार!
- डॉ. के. व्यंकटेशम,
मावळते पोलीस आयुक्त