बसपाच्या ‘हत्ती’वर बंडखोराची स्वारी
By admin | Published: February 7, 2017 01:46 AM2017-02-07T01:46:59+5:302017-02-07T01:46:59+5:30
काँग्रेस व भाजप एकाच शिक्क्याचे दोन रूप असल्याचे सांगणाऱ्या बसपाने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर उमेदवारांना अनेक जागांवर हात देत हत्तीवर स्वार केले आहे.
इच्छुकांनी बनविले पॅनल : भाजपनेही पळविला बसपाचा उमेदवार
नागपूर : काँग्रेस व भाजप एकाच शिक्क्याचे दोन रूप असल्याचे सांगणाऱ्या बसपाने नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर उमेदवारांना अनेक जागांवर हात देत हत्तीवर स्वार केले आहे. तर उत्तर नागपुरातील बसपातील बंडखोर कार्यकर्त्यांनी बहन मायावती विचार मंच स्थापन करून या पॅनल अंतर्गत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे भाजपनेही एका प्रभागातून बसपाचा उमेदवार पळवून आपल्या तिकिटावर उभा केला आहे.
बसपाच्याच काही कार्यकर्त्यांनुसार उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक १ येथून बसपाचे अनुसूचित जातीचे उमेदवार असलेले नितीन नागदेवते हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून बसपात सामील झाले. त्यांना पक्षाने उमेदवारी बहाल केली. याशिवाय याच प्रभागातील मनीष बन्सोड हे भीमसेनेचे कार्यकर्ते आहेत. प्रभाग क्रमांक २ येथून रिना साळवे या भीमसेनेचे नेते श्रीधर साळवे यांच्या पत्नी आहेत.
भीमसेनेने या निवडणुकीत बसपाला समर्थन जाहीर केले होते. या दोन्ही प्रभागात पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची यादी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना डावलून बाहेरच्या उमेदवारांना तिकीट दिल्याने पक्षातील उत्तर नागपुरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यासोबतच बसपाचे प्रदेश सचिव उत्तम शेवडे हे बसपाचे नागपूर शहरातील चेहरे म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रभाग ३३ मधून उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने त्यांचे तिकीट कापून दुसऱ्या प्रभागातील उमेदवाराला तिकीट दिली. भाजपही यात मागे नाही. दक्षिण नागपुरातील प्रभाग ३५ येथून गेल्या निवडणुकीत बसपाकडून निवडणूक लढविणाऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्यानीलेश कुंभारे यांना भाजपने पळविले असून आपल्या तिकिटावर उभे केले आहे. (प्रतिनिधी)
संघ स्वयंसेवकालाही तिकीट
भाजपमधील असंतुष्टांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकालाही बसपाने दक्षिण नागपुरातील एका प्रभागातून तिकीट दिले आहे. अतुल सेनाड असे त्यांचे नाव असून त्यांनी अगोदर भाजपमधून उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना भाजपचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी बसपाचे तिकीट मिळविले. प्रभाग ३१ सर्वसाधारण प्रवर्गातून ते लढत आहेत.
कार्यकर्ते नाराज
पक्षाचे तिकीट न मिळाल्याने बसपातील अनेक कार्यकर्ते संतापले आहेत. पक्षातील प्रदेश नेतृत्वावर ते आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. असेच बसपाच्या उत्तर नागपूर विधानसभेचे महासचिव असलेले नरेंद्र गायकवाड यांनी बसपामध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. मी गेल्या १७ वर्षांपासून पक्षात काम करीत आहे. प्रत्येक वेळा मी तिकीट मागितले परंतु मला नेहमीच ते नाकारण्यात आले. आम्हाला पाच वर्षे शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार सांगितले जातात आणि निवडणूक आली की प्रामाणिक कार्यकर्त्यांना विचारतसुद्धा नाही, असेही त्यांनी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे.