'बिग बीं'च्या चित्रपटाचे नागपुरात शुटिंग ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:02 PM2018-09-26T18:02:07+5:302018-09-26T18:03:51+5:30
गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. साधारणत: चित्रपटांच्या शुटिंगसाठी मुंबई, महाबळेश्वर, कोकण, वाई इत्यादी ठिकाणांऐवजी आता कथेशी निगडीत ‘लोकेशन्स’वर जाऊनच थेट शुटिंग करण्याचा ‘ट्रेन्ड’ दिसून येत आहे. झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’ची कथादेखील रुपेरी पडद्यावर येत असून खुद्द ‘बिग बी’ अमिताभ बच्चन याच्या शुटिंगसाठी नागपूरला येण्याची दाट शक्यता आहे. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘झुंड’ या ‘बिग बॅनर’ चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत वास्तववादी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. साधारणत: चित्रपटांच्या शुटिंगसाठी मुंबई, महाबळेश्वर, कोकण, वाई इत्यादी ठिकाणांऐवजी आता कथेशी निगडीत ‘लोकेशन्स’वर जाऊनच थेट शुटिंग करण्याचा ‘ट्रेन्ड’ दिसून येत आहे. झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’ची कथादेखील रुपेरी पडद्यावर येत असून खुद्द ‘बिग बी’ अमिताभ बच्चन याच्या शुटिंगसाठी नागपूरला येण्याची दाट शक्यता आहे. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘झुंड’ या ‘बिग बॅनर’ चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.
फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सुरुवातीला या चित्रपटाचे शुटिंग मुंबईतच होणार होते. मात्र चित्रपटातून वास्तविकता दिसून यावी यासाठी रिअल लोकेशनवर याचे शुटिंग व्हावे अशी बिग बी यांची इच्छा होती. त्यामुळेच नागपुरातीलच विविध ‘लोकेशन्स’वर चित्रपटाचे शुटिंग होण्याची दाट शक्यता आहे. या चित्रपटाच्या शुटिंगसाठी ७० ते ८० दिवसांचे नियोजन करण्यात आले होते. यातील सुमारे ४० दिवसांचे शुटिंग नागपुरात करण्याचा निर्माते व दिग्दर्शकाचा विचार सुरू आहे. सद्यस्थितीत अमिताभ बच्चन हे एक ‘रिअॅलिटी शो’ व चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून नागपुरात चित्रपटाच्या प्रत्यक्ष शुटिंगला सुरुवात होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यासंदर्भात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. मात्र एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मंजुळे यांनी याबाबत वक्तव्य जारी केले आहे. आम्ही शुटिंगसाठी नागपूरची निवड करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ही कथा या परिसरातील आहे. नागपूरची स्वत:ची एक ओळख व संस्कृती आहे. त्यामुळे येथे शुटिंग झाले तर वास्तविकता दिसून येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूरच्या भाषेची लकब आम्हाला दुसरीकडे सादर करताना अनेक आव्हाने येतील, असे मंजुळे यांनी वक्तव्यातून स्पष्ट केले आहे.
कोण आहेत विजय बारसे ?
हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिले. ‘स्लम सॉकर’चे प्रणेते अशी त्यांची ओळख आहे. वाईट मार्गाला गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. बारसेंच्या प्रशिक्षणाखाली घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला.