नागपुरात मद्यासाठी मोठी गर्दी : विक्रेत्यांचे भरले जात आहेत गल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 12:57 AM2020-05-20T00:57:28+5:302020-05-20T01:02:40+5:30
नागपूर शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या ऑनलाईन तसेच खुल्या देशी विदेशी मद्य तसेच बीअर खरेदीसाठी मद्यपींची जवळपास प्रत्येक दुकानात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे चांगली विक्री होत असल्याने मद्यविक्रेत्यांचा गल्ला भरला जात आहे. दुसरीकडे शासनाच्या तिजोरीतही भरभरून महसूल जमा होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या ऑनलाईन तसेच खुल्या देशी विदेशी मद्य तसेच बीअर खरेदीसाठी मद्यपींची जवळपास प्रत्येक दुकानात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे चांगली विक्री होत असल्याने मद्यविक्रेत्यांचा गल्ला भरला जात आहे. दुसरीकडे शासनाच्या तिजोरीतही भरभरून महसूल जमा होत आहे.
जिल्हाधिकारी नागपूर यांनी १४ मे २०२० रोजी मद्य दुकानांसंदर्भात दिलेल्या आदेशानुसार पोलीस आयुक्त परिक्षेत्रामध्ये वाईन शॉपमधून ऑनलाइन मद्य विक्री व बीअर शॉपीमधून बीअर विक्री तसेच ग्रामीण भागामध्ये परमिट रूम वगळून इतर परवाना प्राप्त दुकानातून मद्य विक्री सुरू आहे. नागपूर ग्रामीण भागात १६३ देशी दारूची दुकाने, १७ वाईन शॉप्स आणि १५ बीअर शॉपीमधून मद्य, बीअर विक्री सुरु आहे. या सर्वच दुकानांत मद्यपीची मोठी गर्दी होत आहे. तसेच शहरातील ७३ वाईन शॉप व ४२ बीअर शॉपीमधून होम डिलिव्हरी सुरू आहे. आज देशी / विदेशी मद्य विक्रीमधून रुपये १ कोटी २२ लाख ८८ हजार ७३३ रुपयांचा महसूल शासनास मिळाला आहे.
परवाने मिळविण्यासाठी गर्दी
मद्य पिण्याचा परवाना मिळावा म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात मद्यपीच्या अर्जांच्या रूपाने मोठी गर्दी झाली आहे.
मंगळवारी दिवसभरात २,८४७ मद्य परवाने ऑनलाईन देण्यात आले. त्यातून रुपये २८ लाख ४७ हजार रुपयांचा महसूल उत्पादन शुल्क विभागाला मिळाला आहे.