नागपूरच्या उच्चभ्रू राजनगर भागात मोठी वीजचोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:24 PM2018-07-10T23:24:52+5:302018-07-10T23:28:56+5:30
एसएनडीएलच्या सतर्कता चमूने काल उच्चभ्रू राजनगर भागातील बहुमजली इमारतीत होत असलेली मोठी वीज चोरी उघकीस आणली आहे. चोरी आढळून आली तेव्हा ११ किलोवॉट कनेक्टेड लोड असल्याचे लक्षात आले. ही घटना सोमवारी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसएनडीएलच्या सतर्कता चमूने काल उच्चभ्रू राजनगर भागातील बहुमजली इमारतीत होत असलेली मोठी वीज चोरी उघकीस आणली आहे. चोरी आढळून आली तेव्हा ११ किलोवॉट कनेक्टेड लोड असल्याचे लक्षात आले. ही घटना सोमवारी उघडकीस आली.
एसएनडीेलने दिलेल्या माहितीनुसार ग्राहक झुबेर रंगूनवाला, प्लॉट क्र ३ विजय नगर, नेल्सन चौक येथे राहत असून ४१००१७०३२०८२, ४१००१६५५३८७९, ४१००१६५५३८५२ हे क्रमांक असलेले वीज मीटर त्यांच्याकडे आहेत. याच परिसरात ग्राहकाचा बांगला आणि बहुमजली इमारत आहे. बहुमजली इमारत असल्याने तिथे एकापेक्षा जास्त मीटर्स आहेत जे तळमजल्याच्या मीटर पॅनल वर आहेत. मीटर रिडींगसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच फ्लॅट्सची मीटर्स दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणच्या काही फ्लॅट्समध्ये नियमित जोडणीच नसल्याचे लक्षात आले आहे. या फ्लॅट्सला बस बारवरून थेट वीज पुरवठा करण्यात येत होता यासाठी अंतर्गत वायरिंगमध्ये काही भूमिगत बदल करण्यात आले. तांत्रिक चमूच्या सजगतेमुळे ही वीज चोरी उघडकीस येऊ शकली.
तत्पूर्वी ग्राहकाने काही फ्लॅट्ससाठी मीटर जोडणी घेतली परंतु प्रयोजनपूर्वक त्याने काही मीटर्समध्ये घोळ केला जो सुमारे ७ लाखांचा आहे. जेव्हा या काही वीज जोडण्यांची बिलं ग्राहकाने भरली नाहीत तेव्हा वीज पुरवठा खंडित करून मीटर कायमचे हटविण्यात आले. त्यानंतर वरील प्रकारे ग्राहकाने या फ्लॅट्समध्ये विद्युत पुरवठा सुरू करून घेतला. या प्रकरणात वितरण फ्रेन्चाइसी ने विद्युत कायद्याच्या सेक्शन १३५ अन्वये (पाहणी दरम्यान वीज चोरी उघड होणे) सतर्कता विषयक प्रकरण नोंदविले असून ग्राहकाला २.२३ लाखांचा असेसमेंट दंड ठोठावण्यात आला आहे. ग्राहकाने पहिली चूक मान्य करून दंड भरण्याची तयारी दर्शवली.
पोलिसात गुन्हा दाखल
दरम्यान मंगळवारी त्याच बाबतीत चमूने पाठपुरावा केल्यास ग्राहकाने आक्रमक होऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान प्रक्रियेप्रमाणे चमूने पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करत असताना ग्राहकाने उपस्थित त्याच्या समर्थकांच्या साथीने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. प्रकरण आटोक्याबाहेर जाण्याआधी एसएनडीएलच्या चमूने सदर पोलीस स्टेशन गाठले आणि घडल्या प्रकारात मदतीची मागणी केली. शोहेब रंगूनवाला आणि त्यांच्या बंधू विरोधात सेक्शन ३२३ (साधी इजा किंवा दुखापत करणे) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल नोंदविण्यात आला आहे.