नागपुरात दोन गटात जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 08:50 PM2018-03-12T20:50:12+5:302018-03-12T20:51:08+5:30
मुलीकडे बघण्याच्या वादातून सिध्दार्थनगर, टेका येथे दोन गटात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात आणि पाचपावली ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटावर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलीकडे बघण्याच्या वादातून सिध्दार्थनगर, टेका येथे दोन गटात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. मुलगी आणि तिच्या नातेवाईकांनी युवकाला आपल्या घरात डांबून बेदम मारहाण केली. ते माहीत होताच पीडित युवकाच्या नातेवाईक आणि मित्रांनी आरोपींच्या घरावर हल्ला चढवून तोडफोड करून मित्राची सुटका करून घेतली. या घटनेमुळे परिसरात आणि पाचपावली ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटावर गुन्हा दाखल
शहबाज रशिद खान (वय १७, रा. टेका नवीन वस्ती) हा त्याच्या दोन मित्रांसह मोटरसायकलवर बसून इंदोराकडे जात होता. सिद्धार्थनगरात एका पाणीपुरीच्या ठेल्यावर तब्बू आपल्या लहान बहिणीसह पाणीपुरी खात होती. ते पाहून हे तिघे थांबले. तो सारखा टक लावून बघत असल्याने तब्बूने त्याला हटकले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. तो मुजोरी करीत असल्यामुळे तब्बूने तिचे वडील नसिम शेख मंसुरी यांना आवाज दिला. ते बाहेर येताच शहबाजचे मित्र पळून गेले. तर, नसिम यांनी शहबाजला पकडून आपल्या घरात नेले. तेथे नसिम, त्यांची पत्नी, तब्बू, तिच्या दोन बहिणी आणि दोन साथीदार या सात जणांनी शहबाजला एका खोलीत बंद करून बेदम मारहाण केली. विनंती आर्जव करूनही ते सोडायला तयार नसल्याचे पाहून घाबरलेल्या शहबाजने आपल्या एका मित्राला मोबाईलवरून फोन करून हा प्रकार सांगितला. ते ऐकून शहबाजचे मित्र आणि नातेवाईक असे १० ते १२ जण नसिम शेखच्या घरावर चालून आले. त्यांनी तब्बू, नसिम आणि त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. त्यांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने येथे जोरदार हाणामारी झाली. यात नसिम यांच्या घरासमोरच्या सीसीटीव्ही कॅमेराची आणि आतमधील साहित्याची तोडफोड करून खोलीत बंद करून ठेवलेल्या शहबाजची सुटका केली. या घटनेमुळे सिद्धार्थनगरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही गटाची समर्थक मंडळी एकमेकांना आव्हान देऊ लागली. माहिती कळताच पाचपावली पोलीस तेथे पोहचले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी दोन्ही गटातील मंडळींना ठाण्यात नेले.
आजी-माजी नगरसेवक ठाण्यात
या वादाचे वृत्त कळताच एका गटाकडून आजी तर दुसऱ्या गटाकडून माजी नगरसेवक पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येत पोहचल्याने ठाण्यात मोठी गर्दी जमली. मध्यरात्रीपर्यंत दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाले. पोलिसांनी तब्बूच्या तक्रारीवरून शहबाजच्या गटातील मंडळीविरुद्ध तर शहबाजच्या तक्रारीवरून तब्बू आणि तिच्या नातेवाईकांना गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.