नागपुरात दोन गटात जोरदार हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 11:57 PM2019-05-06T23:57:05+5:302019-05-06T23:57:44+5:30
कौटुंबिक कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन परिवारात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात पुरुषांसोबतच महिलांनीही एकमेकींना मारहाण केली. नंतर दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कौटुंबिक कारणावरून नातेवाईक असलेल्या दोन परिवारात रविवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. यात पुरुषांसोबतच महिलांनीही एकमेकींना मारहाण केली. नंतर दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणारे आणि शिरपूरकर परिवारात गेल्या काही दिवसांपासून पारिवारिक वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, कीर्ती शिरपूरकर त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी आल्याच्या मुद्यावरून रविवारी रात्री दोन्ही परिवारातील सदस्य समोरासमोर आले. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आरोपी राहुल लोणारे (वय ३०), परेश दिलीप लोणारे (वय २६), छोटू दिलीप लोणारे (वय २४), दिलीप लोणारे (वय ५५), कीर्ती शिरपुरकर (वय ३२), भाग्यश्री राहुल लोणारे (वय २६) यांनी वाद घालून महालमध्ये राहणारे सतीश लोणारे यांना, त्यांची वृद्ध आई तसेच नातेवाईकांना मारहाण केली. सतीश यांची ही तक्रार असताना राहुल मनोहर लोणारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या दुकानात बसून असताना आरोपी पुष्पा लोणारे (वय ६७), सतीश लोणारे (वय ४०), अमित लोणारे (वय ४०), अशोक शिरपूरकर (वय ४०), दिनेश शिरपूरकर (वय ४०) आणि त्यांच्या साथीदारांनी राहुल यांच्याशी वाद घातला. एवढेच नव्हे तर त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मारहाण करून दुकानातील माठ, कांच तसेच अन्य साहित्याची तोडफोड केली. दोन्हीकडून मिळालेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याच्या आरोपाखाली दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले. पुरुष मंडळींना अटक करण्यात आली तर, महिलांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले.