नागपूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:38 AM2018-05-12T00:38:24+5:302018-05-12T00:38:38+5:30
एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘जी. व्ही. सॉ मिल’ नामक कंपनीला गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आग नियंत्रणात येईपर्यंत आतील मशिनरी, कच्चा व पक्का माल आगीच्या भक्ष्यस्थळी पडल्याने अंदाजे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीच्या मालकांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘जी. व्ही. सॉ मिल’ नामक कंपनीला गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आग नियंत्रणात येईपर्यंत आतील मशिनरी, कच्चा व पक्का माल आगीच्या भक्ष्यस्थळी पडल्याने अंदाजे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीच्या मालकांनी दिली. घटनेच्यावेळी कंपनीत कुणीही कामावर नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही.
अशोक गोतमारे यांची हिंगणा एमआयडीसी परिसरात ‘जी. व्ही. सॉ मिल’ नामक कंपनी असून, त्यात ‘बायोमास पॅलेट’ (व्हाईट कोल) तयार केले जाते. या कंपनीत अंदाजे ५० कामगार कार्यरत असून, सर्व जण जनरल शिफ्टमध्येच काम करतात. सर्व कामगार गुरुवारी सायंकाळी घरी गेल्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास आत आग लागल्याचे सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्याने लगेच आगीची माहिती अशोक गोतमारे यांना दिली.
गोतमारे यांच्या सूचनेवरून हिंगणा एमआयडीसीची अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. आतील कच्चा व पक्का माल ज्वलनशील असल्याने आग नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांना रात्री उशिरा पाचारण करण्यात आले. या चार गाड्यांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले.
विशेष म्हणजे, आग विझविण्याचे कार्य रात्रभर सुरूच होते. आग नियंत्रणात येईपर्यंत आतील सर्व मशनरी, ट्रक, जेसीबी रोबोट, शेड, कच्चा व पक्का माल आगीच्या भक्ष्यस्थळी पडला. शिवाय, आगीमुळे आतील मोठ्या शेडचे नुकसान झाले असून, मोठे लोखंडी खांब वाकले. त्यामुळे यात अंदाजे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. शिवाय, ही आग ‘शॉर्टसर्किट’मुळे लागली असावी, असा अंदाज अशोक गोतमारे यांनी व्यक्त केला.
‘बायोमास पॅलेट’ (व्हाईट कोल)
या कंपनीमध्ये ‘बायोमास पॅलेट’ (व्हाईट कोल) अर्थात जळाऊ कांड्यांचे उत्पादन केले जाते. त्यासाठी कच्चा माल म्हणून शेतातील वाळलेल्या तुराट्या, पऱ्हाट्या, सोयाबीनचे कुटार, गव्हाचा गवंडा, लाकडाचा भुसा, तणस, वाळलेले गवत व टाकाऊ काडीकचरा याचा वापर केला जातो. त्यापासून तयार केलेल्या ‘बायोमास पॅलेट’ (व्हाईट कोल)चा वापर कंपन्यांमधील ‘बॉयलर’मध्ये इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या कोळशाला पर्याय म्हणून वापरतात. कच्चा व पक्का माल ज्वलनशील असल्याने आग नियंत्रणात यायला वेळ लागला.
‘वेल्डिंग सिलिंडर’चा स्फोट
‘गॅस वेल्डिंग सिलिंडर’चा स्फोट झाल्याने दोन दुकानांना आग लागली. ही घटना हिंगणा मार्गावरील बन्सनगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळ गुरुवारी मध्यरात्री घडली. बन्सीनगरातील फुटपाथवर रमाशंकर भारती यांचे ‘गॅस वेल्डिंग’चे दुकान आहे. मध्यरात्री ‘गॅस वेल्डिंग सिलिंडर’चा स्फोट झाल्याने दुकानाने पेट घेतला. या आगीने शेजारी असलेल्या अब्दुल शफिक यांच्या ‘रेडिएटर रिपेअरिंग शॉप’ला कवेत घेतले. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यात दोन्ही दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.