नागपुरातील अवैध धंद्यातील मोठे प्लेअर रडारवर : पोलीस आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 10:46 PM2020-11-04T22:46:50+5:302020-11-04T22:48:25+5:30
Commissioner of Police warns against illegal trade of Big player, Nagpur newsशहरात कुठलेही अवैध धंदे चालू देणार नाही. क्रिकेट सट्टा, जुगार अड्डे, अवैध दारू विक्री, रेती व भूमाफियासह कुठलेही अवैध धंदे या शहरातून संचालित केले जाऊ शकत नाही. शहरातील अवैध धंद्याचे प्लेअर पोलिसांच्या रडारवर आहे. वेळ आल्यावर त्यांच्या विरुद्ध कायद्याचा असा वापर करू की ते गुन्हेगारी करण्याचा विचारही करू शकणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कुठलेही अवैध धंदे चालू देणार नाही. क्रिकेट सट्टा, जुगार अड्डे, अवैध दारू विक्री, रेती व भूमाफियासह कुठलेही अवैध धंदे या शहरातून संचालित केले जाऊ शकत नाही. शहरातील अवैध धंद्याचे प्लेअर पोलिसांच्या रडारवर आहे. वेळ आल्यावर त्यांच्या विरुद्ध कायद्याचा असा वापर करू की ते गुन्हेगारी करण्याचा विचारही करू शकणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेगारांना दिला. बुधवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
पोलीस आयुक्त म्हणाले की माझ्या कार्यकाळात अवैध धंदे चालणार नाही, क्रिकेट बुकी व हवाला व्यावसायिकांवर कारवाई सुरू केली आहे. अधिकाऱ्यांना अवैध धंदे संचालित करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. अवैध धंद्यावर कारवाई करणे नंतर आरोपी जामिनावर सुटणे हा चोर-पोलिसांचा खेळ आहे. माझा यावर विश्वास नाही, गुन्हेगार व त्यांचे अवैध धंदे कायमचे बंद करण्यावर माझा भर असल्याचे आयुक्त म्हणाले. रेती व भूमाफिया यांच्याबद्दल चर्चा करताना आयुक्त म्हणाले की, यांच्यावर पोलीस मकोका व एमपीआयडी अंतर्गत कारवाई करतील. रेती माफियांना आरटीओचे संरक्षण असल्यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता, चौकशीत जो दोषी आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. वाठोड्यात भूमाफियाच्या विरोधात दाखल झालेल्या प्रकरणात आर्थिक शाखा तपास करीत असल्याचे ते म्हणाले. आरोपींनी कोट्यवधीची जमीन ५ लाख रुपयात खरेदी केली. यात दुय्यम निबंधकासह संंबधित विभागाला विचारणा करण्यात येईल. दोषींवर कारवाई नक्कीच करण्यात येईल.
वाहतुकीच्या समस्येबाबत चर्चा करताना आयुक्त म्हणाले की, रस्त्यावर व्हीजिबल पोलिसिंग व्हावे, लपून चालान करण्याचा प्रकार बंद करण्यात आला आहे. आता ई-चालानवर जोर देण्यात येत आहे. मुंबईतील वाहतुकीची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी सांगितले की, बांद्रा सी-लिंकवर मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही व स्पीड कंट्रोल लावून १ लाख वाहन चालकांवर कारवाई केली. त्यानंतर अपघाताच्या घटना फार कमी झाल्या. फॅन्सी नंबर प्लेट, ब्लॅक फिल्मचा वापर करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी २० पथक तयार करण्यात येणार आहे. १० पथक अकस्मात कारवाई करतील.
वाहतूक पोलिसांच्या बॉडीवर कॅमेरे देण्यात येईल, या संदर्भात बोलताना आयुक्त म्हणाले की निधीच्या अभावी हे काम रखडले आहे. हे प्रकरण न्यायालयातही प्रविष्ट आहे. ते म्हणाले की शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना थांबविण्यासाठी योजना बनविण्यात येत आहे.
काळे फासणाऱ्यावर कडक कारवाई
नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्याला काळे फासल्या प्रकरणात राजकीय दबाव आहे का? यावर बोलताना आयुक्त म्हणाले की, या प्रकरणात कडक कारवाई करण्यात येईल. यापुढे असे कृत्य करणारे चार वेळा विचार करेल. पोलीस कुणाच्याही दबावात नाही. अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात येईल.
कायद्याची भीती गरजेची आहे
अमितेशकुमार म्हणाले की वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत भीती असणे गरजेचे आहे. १००, २०० रुपये चालान भरून सुटणाऱ्या वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याचे भय नाही. त्यामुळे मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे, राँग साईड गाडी चालविणे या प्रकरणात निष्काळजीपणाने वाहन चालविण्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल. चालान करणे म्हणजे दंड वसूल करणे नव्हे, तर नियमांचे पालन करण्याचे भय निर्माण करणे होय.