मोठा दिलासा, पूर्व विदर्भात गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे ८७ टक्के रुग्ण कमी
By सुमेध वाघमार | Published: August 30, 2022 02:55 PM2022-08-30T14:55:53+5:302022-08-30T15:00:39+5:30
मागील वर्षी १,३५० रुग्ण तर यावर्षी १७१ रुग्ण
नागपूर : मागील वर्षी कोरोनातून दिलासा मिळत नाही तोच डेंग्यूची गंभीर स्थिती निर्माण झाली होती. यावर्षी कोरोनाची भीती नसलीतरी स्वाईन फ्लू, स्क्रब टायफसने डोके वर काढले आहे. त्यात डेंग्यूची भीती वर्तवली जात होती; परंतु मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत ८७ टक्क्याने डेंग्यूची रुग्णसंख्या कमी आढळून आली. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
एक डास माणसाची किती दाणादाण उडवतो आणि व्यवस्था कोलमडून टाकतो, याचा अनुभव मागील आठ वर्षांपासून पूर्व विदर्भातील सहा जिल्हे अनुभवत आहे. डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा ॲण्टीबायोटिक किंवा ॲण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण २०२१ मध्ये आढळून आले होते. नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्हा मिळून ३ हजार ५९५ रुग्ण व १७ मृत्यूची नोंद झाली होती. यामुळे यावर्षी डेंग्यू रुग्णाच्या आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
- मागील वर्षी सर्वाधिक रुग्ण ऑगस्ट महिन्यात
पूर्व विदर्भात २०२१ मध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. १ हजार ३५० रुग्ण, ४ मृत्यू होते. यात
भंडाऱ्यात २३, गोंदियात ११४, चंद्रपुरात २४६ रुग्ण व एक मृत्यू, गडचिरोलीत २४, नागपुरात ८०५ रुग्ण व दोन मृत्यू, तर वर्धेत १३८ रुग्ण व एक मृत्यू होता. यावर्षी २८ ऑगस्टपर्यंत हे सहाही जिल्हे मिळून १७१ रुग्ण आढळून आले आहेत.
- या वर्षी गोंदियात रुग्ण अधिक
३१ ऑगस्ट २०२१ मध्ये नागपूर शहरात २७८ रुग्ण व एक मृत्यू तर ग्रामीणमध्ये ५२७ रुग्ण व एक मृत्यू असे एकूण ८०५ रुग्ण व दोन मृत्यू होते. यावर्षी ऑगस्ट २०२२ पर्यंत शहरात २१ तर ग्रामीणमध्ये १७ असे एकूण ३८ रुग्ण आढळून आले. या वर्षी नागपूरच्या तुलनेत गोंदियामध्ये रुग्ण वाढताना दिसून येत आहे. या जिल्ह्यात ऑगस्ट २०२२ पर्यंत ६७ रुग्णांची नोंद झाली आहे.
- ऑगस्ट महिन्यातील तुलनात्मक रुग्णसंख्या (कंसात मृत्यू)
जिल्हा : ऑगस्ट २०२१ : ऑगस्ट २०२२
भंडारा २३ : ०९
गोंदिया : ११४ : ६७
चंद्रपूर (ग्रा.) : १४१ (०१) : १९
चंद्रपूर शहर : १०५ :०६
गडचिरोली : २४ :१६
नागपूर (ग्रा.) : ५२७ (०१) : १७
शहर : २७८ (१) : २१
वर्धा : १३८ (१) : १६