विदर्भात बंदला मोठा प्रतिसाद; शाळा, व्यावसायिक प्रतिष्ठाने, वाहतूक सकाळपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:15 AM2018-08-09T11:15:37+5:302018-08-09T11:18:22+5:30
आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज राज्यात पुकारलेल्या बंदला विदर्भाच्या विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज राज्यात पुकारलेल्या बंदला विदर्भाच्या विविध भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. वर्धा, यवतमाळ व नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्येही सकाळपासूनच बंदचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांनी स्वेच्छेनेच आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. शाळा महाविद्यालयांना संस्थाचालकांनी सुरक्षिततेची बाब लक्षात घेत, सुटी दिली आहे.
नागपूर शहरात आंदोलकांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. भगवे फेटे घातलेले शेकडो आंदोलक महाल भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याला माल्यार्पण करण्यासाठी जमले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील बोरी तुळजापूर मार्गावर सकाळी सात वाजल्यापासूनच आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या मार्गावर अडकून पडलेल्या प्रवासी गाड्यातील प्रवासी व अन्य वाहन चालक-वाहकांना जेवणही आंदोलकांकडून पुरविले जात आहे. हा महामार्ग विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा मार्ग असल्याने येथे सकाळपासून बरीच वर्दळ असते. जिल्ह्यातील उमरखेड येथे सकाळपासूनच कडकडीत बंद पाळला जात आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे बससेवा पूर्णपणे बंद होती. भंडारा जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही सकाळपासून शुकशुकाट होता.