नागपुरात आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम : ११० स्कूल बसवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 08:37 PM2018-10-29T20:37:14+5:302018-10-29T20:43:04+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात १०५ स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या पाच अवैध वाहनांवर कारवाई करीत २.०१ लाखांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने कंबर कसली आहे. १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान स्कूल बसची तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात १०५ स्कूल बस व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या पाच अवैध वाहनांवर कारवाई करीत २.०१ लाखांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत (आरटीओ) स्कूलबस व स्कूल व्हॅनची वाहन योग्यता तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक आहे़ उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाच्या सूचना आहेत. परंतु स्कूल बसच्या फिटनेसला घेऊन स्कूलबस मालक गंभीर नसल्याचे चित्र आहे. नागपूर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ८२६ स्कूल बस नोंदणीकृत आहेत. यातील ६८३ स्कूल बसेसला ‘फिटनेस’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरित १४३ स्कूल बसने अद्यापही हे प्रमाणपत्र घेतले नसल्याने ‘आरटीओ’ कार्यालयाने काही महिन्यांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली. परंतु त्यानंतरही या स्कूल बसेस फिटनेस तपासणीसाठी आल्या नव्हत्या. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य स्कूल बसेस विद्यार्थ्यांची ने-आण करीत असल्याने त्या धोकादायक ठरत होत्या. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. याची दखल घेत गेल्या १ ते १५ आॅक्टोबरदरम्यान स्कूल बस तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यात २७५ स्कूल बस व व्हॅनची तपासणी करण्यात आली. यात १०५ स्कूलबस व विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणारी पाच अवैध वाहने दोषी आढळून आली. यातील काही बसेस जप्त करून त्रुटी दूर केल्यावरच त्यांना सोडण्यात आले. आरटीओच्या वायुवेग पथकाने केलेल्या धडक कारवाईने स्कूल बस चालकांचे धाबे दणाणले आहे.
स्कूल बस तपासणी मोहीम सुरू राहणार
स्कूल बस तपासणी वायुवेग पथकाकडून सुरू राहणार आहे. दोषी आढळून येणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. यामुळे स्कूल बस चालकांनी आपले वाहन नियमानुसार करावे व वाहतूकीचे सर्व नियम पाळावे.
अतुल आदे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर