बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य : बिहारी चंद्रावरदेखील काम करू शकतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 09:00 PM2019-02-08T21:00:09+5:302019-02-08T21:01:48+5:30
बिहारचे नागरिक अतिशय मेहनती असतात व ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. अगदी चंद्रावरदेखील नोकऱ्या निघाल्या तर ते तेथेदेखील जाऊ शकतात. देशात जर बिहारी नसतील तर कारखाने बंद होतील, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केले. लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भाजपाच्या मन की बात’ या मोहिमेअंतर्गत ते नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिहारचे नागरिक अतिशय मेहनती असतात व ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. अगदी चंद्रावरदेखील नोकऱ्या निघाल्या तर ते तेथेदेखील जाऊ शकतात. देशात जर बिहारी नसतील तर कारखाने बंद होतील, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केले. लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भाजपाच्या मन की बात’ या मोहिमेअंतर्गत ते नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
दोन वेळच्या जेवणाच्या चिंतेत जर कुणी राज्याबाहेर जात असेल तर तो चिंतेचा विषय आहे. मात्र जास्त पैसे कमविण्यासाठी बाहेर जाण्यात काहीही वावगे नाही. प्रत्येकाला तो अधिकार आहे. गुजरात, पंजाबसारख्या राज्यातील लोकदेखील रोजगारासाठी अमेरिका व कॅनडाला जातात. बिहारमध्ये महाराष्ट्रातीलदेखील अनेक लोक आहेत. अशा स्थितीत बिहारींच्या बाहेर काम करण्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेदेखील मराठी जनता बिहारींच्या विरोधात नाही. राजकारणातूनच विरोधाचे प्रकार घडतात, असे सुशील कुमार मोदी म्हणाले. बिहारचा विकासदर देशात सर्वात जास्त असून रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बिहारमधून मजूर का येत नाही, असे इतर राज्यांतील मुख्यमंत्री फोन करून विचारत असल्याचे त्यांनी सांगितले.
राफेल प्रकरणात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरदेखील चुकीचे संदर्भ देऊन आरोप करत आहेत. हा न्यायालयाचा अपमानच आहे. कॉंग्रेसकडे खरोखरच काही तथ्य असतील तर त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. त्यांनी तसे का केले नाही, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
शत्रुघ्न हे गर्दी खेचायला प्रियंका चोप्रा नाहीत
यावेळी त्यांनी भाजपाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. शत्रुघ्न यांना असे वाटते की आजही त्यांचा ‘जलवा’ कायम आहे. मात्र उभे राहिल्यावर लगेच गर्दी खेचायला ते काही प्रियंका चोप्रा नाहीत. शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१० मध्ये विधानसभा निवडणुकांत भाजपाचा प्रचार केला नव्हता. मात्र तेव्हा भाजपाला बिहारमध्ये दणदणीत विजय मिळाला होता. शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटणातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच मोदी यांनी दिले.
पक्ष आपलेच जाहीरनामे गंभीरतेने घेत नाही
निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून आश्वासने देणारे जाहीरनामे मांडण्यात येतात. मात्र जनता व राजकीय पक्ष या जाहीरनाम्यांना निवडणुकांनंतर गंभीरतेने घेत नाहीत, असा दावा सुशील कुमार मोदी यांनी केला. भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून १० कोटी नागरिकांशी यासाठी थेट संपर्क साधण्यात येणार आहेत. तसेच देशात ३०० ‘ई’ रथ तयार करण्यात आले असून ते ४० दिवस फिरतील, असे त्यांनी सांगितले.