बिहारच्या मजुरांची पायपीट एनडीएला करेल चित : अविनाश पांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 20:15 IST2020-11-03T20:12:40+5:302020-11-03T20:15:10+5:30
Bihar Election, Avinash pande,Nagpur newsती पायपीट, तो मनस्ताप बिहारचे मजूर अजून विसरलेले नाहीत. याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून येईल. एनडीए बिहारमध्ये चित होईल, असा दावा बिहारमधील काँग्रेसच्या छाननी समितीचे प्रमुख माजी खासदार अविनाश पांडे यांनी केला.

बिहारच्या मजुरांची पायपीट एनडीएला करेल चित : अविनाश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात बाहेर असलेले मजूर कडक उन्हात शेकडो किलोमीटरची पायपीट करीत बिहारमध्ये परतले. नितीशकुमार यांच्या सरकारने त्यांच्या प्रवासासाठी कुठलीही व्यवस्था केली नाही. उलट अटी लादून अनेकांना सीमेवर रोखून धरले. ती पायपीट, तो मनस्ताप बिहारचे मजूर अजून विसरलेले नाहीत. याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून येईल. एनडीए बिहारमध्ये चित होईल, असा दावा बिहारमधील काँग्रेसच्या छाननी समितीचे प्रमुख माजी खासदार अविनाश पांडे यांनी केला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना पांडे म्हणाले, बिहारमध्ये काँग्रेस ७० जागांवर लढत असली तरी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांचा सकारात्मक प्रभाव संपूर्ण निवडणुकीवर होत आहे. राहुल गांधी व तेजस्वी यादव ही जोडी युवकांना आकर्षित करीत आहे. उमेदवारी देतानाही काँग्रेसने युवकांवर जोर लावला आहे. दुसरीकडे नितीशकुमार यांनी उद्योग, रोजगार याकडे लक्ष दिले नाही. बेरोजगारी वाढली आहे. याचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल. बिहारची निवडणूक ही देशाला दिशा देणारी ठरेल, असा दावा त्यांनी केला.
नितीशकुमार यूपीएसोबत येण्याची शक्यता?
नितीशकुमार हे पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य व अधिकारच उरला नाही. या अस्वस्थतेतून निकालानंतर नितीशकुमार हे यूपीएसोबत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्यावेळच्या परिस्थितीनुसार काँग्रेस महाआघाडी त्याबाबतीतील निर्णय घेईल. आताच ठोस सांगणे योग्य होणार नाही, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.