विचित्र अपघातात ट्रॅक्टरखाली येऊन बाईकस्वाराचा मृत्यू; नागपूर-वर्धा मार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 02:46 PM2022-12-10T14:46:06+5:302022-12-10T16:04:07+5:30
ट्रकची कारसह ट्रॅक्टरला धडक
बुटीबाेरी/टाकळघाट (नागपूर) : अनियंत्रित ट्रकने कारला जाेरात धडक दिल्याने ती कार दुभाजकावर आदळत दुसऱ्या लेनवर गेली. त्यातच त्या ट्रकने राेडलगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. त्याचवेळी दुचाकीचालक ट्राॅलीच्या मागच्या चाकाखाली आला. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-वर्धा मार्गावरील टाकळघाट फाटा येथे शुक्रवारी (दि. ९) सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली.
संजय रामकृष्ण खापणे (४०, रा. वाॅर्ड क्र.-६, बुटीबोरी, ता. नागपूर ग्रामीण) असे मृताचे नाव आहे. ट्रक (क्र. एमएच-४९ एटी-५४७७) तुरीचे पाेती घेऊन वर्धेहून नागपूरच्या दिशेने जात हाेता. टाकळघाट फाटा परिसरात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रकने समाेर असलेल्या कारला (क्र. एमएच २९ एडी ३७५०) जाेरात धडक दिली. त्यामुळे ती दुभाजकावर आदळत दुसऱ्या लेनवर गेली. याच अनियंत्रित ट्रकने लगेच राेडलगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला (क्र. एमएच ४० ए ६४८४) धडक दिली.
माेटारसायकलने (क्र. एमएच ३१ एवाय ८६५८) जात असलेले संजय खापणे ट्रॅक्टरच्या ट्राॅलीच्या मागच्या चाका खाली आले. यात डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविला. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी विनोद अंबादास पट्टे (५०, रा. वडगाव, आर्णी रोड, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
तिघांसह छाेटी मुले थाेडक्यात बचावले
विनाेद पट्टे कारने (क्र. एमएच २९ एडी ३७५०) उमरेड येथे नातेवाइकांकडे लग्नासाठी जात हाेते. त्या कारमध्ये तिघांसह दाेन छाेटी मुले प्रवास करीत हाेते. ट्रकने मागून धडक देताच कार दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवर गेली. सुदैवाने कार उलटली नाही. त्यामुळे तिघांसह छाेटी मुले थाेडक्यात बचावली. मृत संजय खापणे यांनी हेल्मेट घातले नव्हते, अशी माहिती पाेलिसांनी दिली. ट्रकचालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघात हाेताच ताे पळून गेल्याने त्याचा शाेध सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.