नंबरप्लेटवरील खोडतोड महागात, सराईत वाहनचोर जाळ्यात
By योगेश पांडे | Published: March 10, 2023 05:02 PM2023-03-10T17:02:54+5:302023-03-10T17:07:07+5:30
शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल
नागपूर : मानकापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने एका सराईत वाहनचोरास अटक केली असून त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत त्याने सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे, खोडतोड केलेली नंबरप्लेट असलेली मोटारसायकल चालवत असल्याने पोलिसांना त्याचा संशय आला व त्यानंतर तो हाती लागला.
तेजस ऊर्फ ओम अंबर राणावत (२१ मानकापूर) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा कळमेश्वर येथील आहे. ७ मार्च रोजी मानकापूर पोलिस ठाण्यातील पथक दुपारी पेट्रोलिंग करत असताना तेजस हा नंबरप्लेट खोडतोड केलेल्या दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली. त्याच्या कंबरेत एक शस्त्र आढळून आले व त्याच्याविरोधात शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याची आणखी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने तो चालवत असलेली दुचाकी सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची माहिती दिली. सोबतच त्याने मानकापूर येथून दोन, हुडकेश्वर येथून दोन, कपिलनगर व गिट्टीखदान येथून प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ५ दुचाकी जप्त केल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांग वानखडे, मंगला मोकाशे, सुनील डगवाल, प्रवीण भोयर, अनुप यादव, योगेश महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चोरीच्या दुचाकीने मोबाइल हिसकावले
आरोपीने चोरीच्या दुचाकीचा वापर करून डिसेंबर २०२२ मध्ये मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच दोन महिलांचा मोबाइल हिसकावला. त्यासाठी त्याने त्यांच्यावर मिरची पावडर फेकत त्यांना जखमी केले होते. आरोपीविरोधात आणखी गुन्हेदेखील दाखल असल्याची बाब समोर आली आहे.