सराईत दुचाकीचोर जेरबंद, अमरावतीतील बिअरबारमधून अटक, १६ लाखांच्या दुचाकी जप्त
By योगेश पांडे | Published: August 4, 2023 05:09 PM2023-08-04T17:09:20+5:302023-08-04T17:11:41+5:30
नागपुरसह अमरावतीत दुचाकींवर मारला होता हात
नागपूर :अमरावती व नागपुरातून दुचाक्या चोरणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपींना पोलिसांनी अमरावतीतील बिअरबारमधून अटक केली व त्यानंतर काही तासांतच पूर्ण टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. वाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
वसंत निकारे (५४, वाडी) यांची २५ जुलै रोजी मोटारसायकल चोरी गेली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी सीसीटीव्ही व इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून तपास सुरू केला असता दोन आरोपी अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपले असल्याची बाब समोर आली. पोलिसांनी सापळा रचून अमरावतीतील एका बिअरबारमधून ह्रितीक लेखीराम लांजेवार अहमद (२०, कंट्रोल वाडी, आंबेडकरनगर, नागपूर) व संकेत दीपक कडू (२१, श्रीनगर, अचलपूर, अमरावती) यांना ताब्यात घेतले.
अगोदर आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली आणि त्यांच्यासोबत कुणाल किसन बने (२८, रामबाग, नागपूर) व प्रितम उर्फ सिंधू उमाशंकर शर्मा (२८, कंट्रोल वाडी, आंबेडकरनगर) हे सहकारी असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांनादेखील अटक केली. या टोळीने अमरावती व नागपुरात वाहनचोरी तसेच घरफोड्या केल्याची कबुली दिली.
त्यांनी वाडीतून सहा, गिट्टीखदानमधून दोन, एमआयडीसी-अंबाझरी व अमरावतीतील राजापेठमधून प्रत्येकी एक दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यांच्या ताब्यातून एकूण १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच आरोपींनी वाडीत तीन व गिट्टीखदान-धंतोली-प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी केल्याचेदेखील सांगितले. त्यांच्या ताब्यातून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप रायण्णावार, विनोद गोडबोले, राहुल सावंत, गणेश मुंडे, तुलसीदास शक्ला, अजय पाटील, दुर्गादास माकडे, सोमेश्वर वर्धे, राहुल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.