नागपुरातील क्वारंटाईन केंद्रातील जेवण व साहित्याचे बिल अडीच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 08:33 PM2020-07-06T20:33:43+5:302020-07-06T20:35:08+5:30
कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रांच्या व्यवस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बेडशीट व पॅकिंग अशा बिलांचा बोजा अधिक आहे. तर मोफत भोजन व्यवस्था झाल्याने महापालिकेचा खर्च वाचला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नागपूर मनपाचा खर्च कमी असून आजवर जवळपास २.५० कोटी खर्च झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी शहरात करण्यात आलेल्या क्वारंटाईन केंद्रांच्या व्यवस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बेडशीट व पॅकिंग अशा बिलांचा बोजा अधिक आहे. तर मोफत भोजन व्यवस्था झाल्याने महापालिकेचा खर्च वाचला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत नागपूर मनपाचा खर्च कमी असून आजवर जवळपास २.५० कोटी खर्च झाले आहेत.
शहरात कोरोना साथ सुरू झाल्यावर क्वारंटाईन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. नागपुरात व्हीएनआयटी, आमदार निवास, सिम्बॉयसिस, पाचपावली, वनामती, आरपीटीएस, राजनगर, नीरी आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी दाखल होणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला जिल्हा प्रशासनातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. प्रतिव्यक्ती दिवसाला ६०० रुपये खर्च येत होता. २ मेपासून ही व्यवस्था महापालिकेकडे आली. त्यानंतर प्रति व्यक्ती १५९ रुपये दराने निविदा काढण्यात आली. २ ते २५ दरम्यान यासाठी मनपाने ७५.७५ लाख रुपये खर्च केले. त्यानंतर २६ मेपासून राधास्वामी सत्संग मंडळाकडे मोफत जेवणाची व्यवस्था देण्यात आली. मनपाकडे चहा, बिस्किट व पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी आहे. यावर प्रतिव्यक्ती ५२.४७ रुपये दराने खर्च केला जात आहे. यावर जून अखेरीस ३२.३८ लाख रुपये खर्च करण्यात आले. तसेच राधास्वामी सत्संग येथून जेवण मोफत मिळत असले तरी पॅकिंग खर्च मनपाला करावा लागत आहे. प्रति पॅकिंग १२.५८ रुपये दराने ७.८१ लाख रुपये खर्च करण्यात आले.
खर्चाची मोठी बचत
क्वारंटाईन सेंटरवर नागरिकांना जेवण, गाद्या, उशा, बेडशीट, बकेट, मग, झाडू, डस्टबिन, टॉवेल असे साहित्य पुरविले. यावर सुमारे २.५० कोटी रुपये खर्च करण्यात आला. क्वारंटाईन केंद्राच्या व्यवस्थेच्या बिलाबाबत विचारले असता अतिरिक्त आयुक्त राम जोशी म्हणाले की, राधास्वामी सत्संग मंडळामुळे मनपाचा जेवनावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. सॅनिटायझर, मास्क सेवाभावी संस्थांकडून मिळाले आहेत. यात मनपाची बचत झाली.
दररोज प्रतिव्यक्ती ५२.४७ रुपये खर्च
क्वारंटाईन केंद्राच्या व्यवस्थेवर जवळपास २.५ कोटी खर्च आला आहे. जेवण मोफत असले तरी चहा, बिस्किट व पॅकिंग, वाहतूक यावर मनपा खर्च करीत आहे. दर दिवसाला प्रतिव्यक्ती ५२.४७ रुपये खर्च होत आहेत. तसेच पॅकिंगवर प्रति पॅकिंग १२.५८ रुपये खर्च होत आहेत. २ मेपासून महापालिकेकडे ही जबाबदारी आहे.