फलक लावले तरच बिले निघणार
By admin | Published: October 26, 2015 02:54 AM2015-10-26T02:54:18+5:302015-10-26T02:54:18+5:30
जिल्हा परिषदेमार्फत कंत्राटरादारांच्या माध्यमातून विविध बांधकामे, विकासकामे केली जातात.
कंत्राटदारांना इशारा : जि.प. बांधकाम समितीचा निर्णय
नागपूर : जिल्हा परिषदेमार्फत कंत्राटरादारांच्या माध्यमातून विविध बांधकामे, विकासकामे केली जातात. बरेचदा कामे पूर्ण होत नसतानाही कंत्राटदार बिले उचलत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यापुढे कंत्राटदारांनी बांधकाम पूर्ण झाल्याचा फलक लावणे गरजेचे आहे. फलक न दिसल्यास बिले काढली जाणार नसल्याचा निर्णय जि.प.च्या बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
कामे पूर्ण झाली नसतानाही कंत्राटदार बिले उचलतात यासंदर्भात समितीचे सदस्य कमलाकर मेंघर यांनी बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. जी बांधकामे पूर्ण झाली त्या बांधकामाशेजारी माहितीदर्शक फलक लावला जात नाही. परिणामी, काम कोणत्या फंडातील आहे, कोणत्या वर्षातील आहे, कामाचे स्वरूप काय, किती वेळात पूर्ण करायचे होते, याविषयी कोणतीही माहिती नसते. त्यामुळे माहिती फलक लावण्याची सूचना कंत्राटदारांना करावी, अशी मागणी मेंघर यांनी केली. यावर बांधकाम झाल्यानंतर फलक लावणे अनिवार्य असून, फलकाचा फोटो पाहिल्यानंतरच कंत्राटदारांची बिले काढली जातील, असा निर्णय सभेत घेण्यात आला. करारानंतरही ग्रा.पं.कडून बांधकामाची निविदा काढली जाते, याकडेही लक्ष वेधण्यात आले. जि. प. स्तरावरील कामांना ग्रा.पं. करण्यास सक्षम आहे, अशी सहमती दर्शविल्यानंतरच ग्रा.पं. सोबत करारनामा करण्यात येतो. एकदा ग्रा.पं. सोबत करारनामा झाल्यानंतर परत त्याच कामाची ग्रा.पं. ने निविदा काढणे ही बाब कराराच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ग्रा.पं. ने एकाच कामाची निविदा पुन्हा काढू नये, अशा सूचना ग्रामपंचायतींना दिल्या जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष शरद डोणेकर यांनी सांगितले. बैठकीला सदस्य चंद्रशेखर चिखले, नंदा नारनवरे, सुरेंद्र शेंडे, शांताराम मडावी, कमलाकर मेंघर, आदी उपस्थित होते.