गारमेंट उद्योगाला कोट्यवधींचे नुकसान; टेलरिंग व्यवसाय मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:18+5:302021-06-03T04:07:18+5:30
नागपूर : गेल्यावर्षी आणि यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे लग्नसराई व सणांचे हंगाम बुडाल्याने आणि शालेय पोशाखांच्या ऑर्डर न मिळाल्याने गारमेंट ...
नागपूर : गेल्यावर्षी आणि यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे लग्नसराई व सणांचे हंगाम बुडाल्याने आणि शालेय पोशाखांच्या ऑर्डर न मिळाल्याने गारमेंट उद्योगाला दीड वर्षात दोन हजार कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याशिवाय दुकाने बंद राहिल्याने टेलरिंग व्यवसाय मोडकळीस आला आहे. कारागिरांचे उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने संसाराचा गाडा चालविणे कठीण झाले आहे.
गारमेंट उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण
गारमेंट क्लस्टरचे प्रमुख विपुल पंचमतिया म्हणाले की, नागपुरात ६०० पेक्षा जास्त लहान-मोठे गारमेंट उत्पादक आहेत. दोन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने सर्वांनीच उत्पादन बंद केले आहे. अनेकांकडे जुना माल पडून आहे. दसरा व दिवाळी सण व लग्नकार्य पाच महिन्यांवर असल्याने उत्पादन सुरू करण्यास कुणीही धजावत नाही.
उत्पादक अमित जैन म्हणाले, जवळपास दीड वर्षापासून गारमेंट व्यवसाय संकटात आहे. त्यामुळे नागपुरातील १० हजारांपेक्षा जास्त कारागीर बेरोजगार झाले असून, त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. लग्न २५ जणांच्या उपस्थितीत होत असल्याने नातेवाईक गारमेंट खरेदी करीत नाहीत. त्याचाही फटका व्यवसायाला बसला आहे. गेल्यावर्षीचे संकट पाहता यंदा उत्पादकांनी कच्च्या मालाची खरेदी केली नाही.
भविष्याचे नियोजन कुचकामी
तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दसरा, दिवाळी अणि अन्य सणांसाठी गारमेंट निर्मिती करण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही. कोरोनाच्या भीतीने उत्पादकांचे भविष्याचे नियोजन कुचकामी ठरणार आहे. सध्या ग्राहक नसल्याने पावसाळ्यापूर्वी जुना माल सेलमध्ये विक्रीत काढण्यासाठी दुकानदारांनी तयारी केली आहे.
टेलरिंग व्यवसायावर रोजगाराचे संकट
लॉकडाऊनमुळे टेलरिंग व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला असून, या क्षेत्राशी जुळलेल्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. गेल्यावर्षी लग्नसराईचा हंगाम बुडाला, शिवाय यावर्षीही २५ जणांच्या उपस्थितीतच लग्नकार्य होत असल्याने कुणीही टेलरकडे कपडे शिवण्यासाठी जात नाही. काही वर्षांपासून रेडिमेड गारमेंटचे चलन वाढल्याने टेलरिंग व्यवसाय हळूहळू कमी होत आहे. त्यातच काही नामांकित टेलरला लोकांची पसंती आहे; पण उत्पन्न नसल्याने कारागिरांना घर चालविणेही कठीण झाले असून, जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अनेक जण उधार पैसे घेऊन संसाराचा गाडा खेचत आहेत.
हुडकेश्वर येथील टेलर सतीश कामडी म्हणाले, लग्नसराईत कोट शिवण्यासाठी अनेक जण यायचे; पण गेल्यावर्षी आणि यंदा लग्नाचा सिझन न मिळाल्याने उत्पन्न बंद झाले. ग्राहकांना मोबाइलद्वारे घरीच कपडे शिवून मिळणार असल्याचे मॅसेज पाठविले. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कमी दरातही शिवून देण्याची तयारी आहे.
टेलर विठ्ठल देवघरे म्हणाले की, दोन वर्षांपासून शालेय पोशाखांच्या ऑर्डर न मिळाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण झाले आहे. कच्च्या मालाचे भाव वाढले असून, वाढत्या महागाईत कमी दरात कपडे शिवणे परवडत नाही; पण संसाराचा गाडा चालविण्यासाठी तडजोड करावी लागत आहे.
- नागपुरात ८०० पेक्षा जास्त लहान-मोठे गारमेंट उत्पादक
- दीड वर्षात दोन हजार कोटींचे नुकसान
- १० हजारांपेक्षा जास्त कारागिरांवर संकट
- लग्नसराईचे सर्वच हंगाम बुडाले
- जुना माल पडून, सेलची तयारी