मनपाचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावावर नागपुरात कोट्यवधीचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 10:49 AM2021-02-04T10:49:41+5:302021-02-04T10:51:11+5:30
Nagpur News महापालिकेचे कंत्राट मिळवून देण्याचे आणि व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून इतवारीतील एका व्यापाऱ्यास हुक्का पार्लरच्या संचालकाने कोट्यवधीचा चुना लावला.
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेचे कंत्राट मिळवून देण्याचे आणि व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून इतवारीतील एका व्यापाऱ्यास हुक्का पार्लरच्या संचालकाने कोट्यवधीचा चुना लावला. फसवल्या गेलेल्या लोकांमध्ये बहुतांश गारमेंट व्यापारी आहेत. इतवारीतील व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.
सूत्रानुसार फसवणुकीत सहभागी युवकाचे हुक्का पार्लर आहे. यात इतर दोन युवकही सहभागी आहेत. या हुक्का पार्लरमध्ये शहरातील चर्चित लोक आणि नेत्यांच्या मुलांचे येणे-जाणे असते. नेत्यांच्या मुलांसोबत उठणे-बसणे असल्याने हा युवक नेते मंडळी व त्यांच्याशी संबंधित लोकांच्या संपर्कात आला. यादरम्यान तो एका नेत्याच्या संपर्कात आला. तो नेता एका राष्ट्रीय पक्षाच्या युवक आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीचा पदाधिकारी आहे. या नेत्याने युवकाला मनपाचे कंत्राट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याने त्या युवकाला लहान-मोठे कामही मिळवून दिले. यानंतर युवकाला त्याच्यावर विश्वास बसला. असे सांगितले जाते की, युवकाने या नेत्याला काही दिवसातच मोठी रक्कम दिली. या नेता पुत्राच्या भरवशावर युवकाने मनपातील मोठमोठे कंत्राट मिळण्याचे स्वप्न पाहू लागला.
युवकाने जेसीबी. पोकलॅण्ड मशीन खरेदी केली. मोठे कंत्राट मिळण्याच्या अपेक्षेने आपल्या ओळखीच्या गारमेंट व्यापाऱ्याला त्याला मिळणाऱ्या कंत्राटात गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. युवक व त्याचे साथीदार हुक्का पार्लरमध्ये होणाऱ्या नेता पुत्रांचे ‘सेलिब्रेशन’ सोशल मीडियावर अपलोड करीत होते. ही बाब व्यापाऱ्यांना होती. नेत्यांसोबत त्यांची असलेली मैत्री आणि कंत्राट सुरू झाल्याने पैसे बुडण्याचा संशय व्यापाऱ्यांना झाला नाही. युवकाने व्यापाऱ्यास मोठ्या प्रमाणावर व्याज देण्याचे आमिष देऊन गुंतवणूक करण्यास राजी केले. एक ते दीड वर्षातच १० ते १२ कोटी रुपये घेतले.
युवकाने लोकांना ठेकेदारीत गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम परत करणे किंवा ३ टक्के मासिक व्याज देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला काही लोकांना मासिक व्याज दिले, नंतर देण्यास टाळाटाळ करू लागला. मनपाचे कुठलेही कंत्राट न मिळाल्याने दुप्पट रक्कम मिळण्याची अपेक्षा असलेले व्यापारी चिंतेत पडले. मागील काही दिवसापासून युवक गुंतवणूकदारांना वेगवेगळी आश्वासने देत होता. १५ दिवसापूर्वीच तो पैसे परत करण्यासाठी दोन वर्षाची मुदत मागू लागला. तेव्हा व्यापाऱ्यांना ते फसवल्या गेल्याचे लक्षात आले. एक महिन्यापूर्वीसुद्धा जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून जागनाथ बुधवारी येथील एका व्यापाऱ्यास कोट्यवधी रुपयाने फसविण्यात आले. ते प्रकरणही लोकमतने उघडकीस आणले होते.
पीडितांमध्ये विधवा महिलाही
फसवल्या गेलेल्या लोकांची संख्या २० ते २५ आहे. यात १० ते १२ कोटी रुपये अडकले आहेत. बहुतांश लोकांनी रोख रक्कम युवकाला दिली होती. पीडितांमध्ये सात ते आठ महिला असल्याचे सांगितले जाते. यात काही महिला विधवा आहेत. त्यांनी मुलांचे शिक्षण व लग्नासाठी जमविलेली रक्कम गुंतविली होती. त्या महिलांना प्रचंड धक्का बसला आहे. आर्थिक संस्थांकडून चौकशी होण्याच्या भीतीमुळे अनेक जण पोलिसात तक्रार करण्यास मागे-पुढे पाहत आहेत.
नेत्यांच्या नादी लागून निघाले दिवाळे
या प्रकरणाशी संबंधित युवकाचा नेत्यांच्या नादी लागून दिवाळे निघाले. मागील काही दिवसापासून तो नेत्यांच्या आयोजनात पाण्यासारखा पैसा खर्च करत होता. पूर्व व मध्य नागपुरातील प्रत्येक मोठ्या आयोजनात हा युवक व त्याच्याशी संबंधित लोकांची उपस्थिती राहत होती. त्यामुळेच नेत्यांनी त्यालाही पदाधिकारी बनविले. यानंतर लोकांचा त्याच्यावर विश्वास वाढला.