स्मार्ट व्हिलेजच्या धर्तीवर बीना गावाचे पुनर्वसन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:47+5:302021-02-27T04:08:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज, पाणीपुरवठा, गडरलाईन, बगिचे आदी सर्व पायाभूत सोयी-सुविधांनी युक्त स्मार्ट व्हिलेजच्या धर्तीवर बीना गावाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज, पाणीपुरवठा, गडरलाईन, बगिचे आदी सर्व पायाभूत सोयी-सुविधांनी युक्त स्मार्ट व्हिलेजच्या धर्तीवर बीना गावाचे पुनर्वसन करण्यात येईल, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मिहानचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी जगदीश काटकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वेस्टर्न कोल्ड फिल्ड (वेकोलि)ने सीएसआर फंडामधून बीना येथील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी पुढाकार घेत ही विकासकामे जलदगतीने पूर्णत्वास न्यावीत. राज्य शासन आवश्यकता असेल तिथे मदत करेल, असे सांगून राऊत म्हणाले की, या गावाचे पुनर्वसन करताना जागेचे १२२ कोटी रुपये महानिर्मितीने
वेकोलिला द्यावेत. येथून निघणारा कोळसा सामंजस्य करार करून कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, महाजेनकोला नोटिफाइड दरानेच देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गतवर्षी नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे गावालगतचा काही भाग खचला असून, वेकोलिने सीएसआर फंडातून गावालगतही मातीचा भराव टाकावा. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या पुरामुळे धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी वेकोलि व राज्य शासनाच्या महसूल विभागाचे अधिकारी संयुक्त पाहणी करतील आणि पुढील सूचना देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या.
मेकोसाबाग-शिवणगावाचाही घेतला आढावा
मेकोसाबागेतील ख्रिश्चन कॉलनी येथील भूखंडाच्या मालकी हक्काचे पट्टेवाटपासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. मिहान प्रकल्पांतर्गत शिवणगाव पुनर्वसनाबाबत घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सुनावण्या जलदगतीने घ्याव्यात तसेच त्या नोंदी घेऊन येथील पुनर्वसनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यासोबतच मासे विक्रेता संघाच्या शिष्टमंडळासोबत यावेळी चर्चा करण्यात आली. शहरातील मासे विक्रेत्यांना सर्व सोयीसुविधांनी युक्त असे गाळे रेल्वेस्थानकाजवळील परिसरात उपलब्ध करून द्यावेत, असे सांगितले.