‘बायो-टॉयलेट’मुळे वाढेल आता रेल्वे रुळांचे आयुष्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:01 AM2020-06-30T11:01:05+5:302020-06-30T11:02:26+5:30
पारंपरिक शौचालयांमुळे उद्भवत असलेल्या समस्यांवर उपाय शोधून काढत मध्य रेल्वे झोनने पारंपरिक शौचालयांच्या ऐवजी बायो टॉयलेट लावण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार मागील १० वर्षात झोनमधील सर्वच कोचमध्ये बायो टॉयलेट बसविण्यात आले आहेत.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेगाड्यातील पारंपरिक शौचालयामुळे मलमूत्र रेल्वे रुळावर पडल्यामुळे रेल्वे रुळांचे आयुष्य कमी होत होते. आजूबाजूच्या परिसरातील नैसर्गिक जलस्रोतही दूषित होत होते. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत होती. यावर उपाय शोधून मध्य रेल्वेने झोनमधील ५,०१५ कोचमध्ये १८,४५० बायो टॉयलेट बसविल्यामुळे पर्यावरण, जलस्त्रोत दूषित होणार नसून रेल्वे रुळांचे आयुष्य वाढण्यासही मदत होणार आहे.
भारतीय रेल्वेत असलेल्या पारंपरिक शौचालयातील मलमूत्र थेट रेल्वे रुळावर पडत होते. यामुळे रेल्वे रुळांचे आयुष्य कमी होत होते. रेल्वे रुळावर मलमूत्र पडल्यामुळे या परिसरातील नैसर्गिक जलस्रोत दूषित होत होते. रेल्वे रुळांची देखभाल करणाऱ्या गँगमननाही यामुळे विविध आजार जडत होते. रेल्वेस्थानकावर गाडी थांबल्यामुळे या गाड्यांची देखभाल करणाºया अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण होत होते. पारंपरिक शौचालयांमुळे उद्भवत असलेल्या समस्यांवर उपाय शोधून काढत मध्य रेल्वे झोनने पारंपरिक शौचालयांच्या ऐवजी बायो टॉयलेट लावण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार मागील १० वर्षात झोनमधील सर्वच कोचमध्ये बायो टॉयलेट बसविण्यात आले आहेत. एका कोचमध्ये ४ बायो टॉयलेट याप्रमाणे १८ हजार ४५० बायो टॉयलेट बसविले आहेत.