जैवविविधता दिन; अंबाझरी जैवविविधता उद्यानाला वैविध्याचे कोंदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:39 AM2020-05-22T08:39:22+5:302020-05-22T08:39:48+5:30

हिरवीगार वनराई, विस्तीर्ण तलाव, त्या जलाशयात १६ प्रजातींचे मासे, पक्ष्यांचा मंजूळ आवाज, अवतीभवती भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, विविध रंगीबेरंगी पक्षी, मुक्कामाला आलेले पाहुणे पक्षी अन् हे कमी की काय म्हणून १५ प्रकारच्या गवती प्रजाती! हे वर्णन आहे आपल्या नागपूरच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानाचे!

Biodiversity Day; Ambazari Biodiversity Park | जैवविविधता दिन; अंबाझरी जैवविविधता उद्यानाला वैविध्याचे कोंदण

जैवविविधता दिन; अंबाझरी जैवविविधता उद्यानाला वैविध्याचे कोंदण

गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिरवीगार वनराई, विस्तीर्ण तलाव, त्या जलाशयात १६ प्रजातींचे मासे, पक्ष्यांचा मंजूळ आवाज, अवतीभवती भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, विविध रंगीबेरंगी पक्षी, मुक्कामाला आलेले पाहुणे पक्षी अन् हे कमी की काय म्हणून १५ प्रकारच्या गवती प्रजाती! हे वर्णन आहे आपल्या नागपूरच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानाचे!
नागपूर शहरावर निसर्गाचा वरदहस्तच आहे. वनराई मनाला भुरळ घालावी, अशीच आहे. शहराच्या पश्चिम-दक्षिणेकडील गोरेवाडा जंगलाची सीमा थेट नागपूर शहराला भिडते. याच सीमेलगत अंबाझरी तलाव आपल्या गतकालीन वैभवाची साक्ष देत आहे. सन १८७० मध्ये भोसलेशाहीच्या काळात नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अंबाझरी तलावाची निर्मिती करण्यात आली.
हा प्रकल्प ७५८.७४ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रामध्ये पसरला आहे. याला जैवविविधता प्रकल्प म्हणून २०१६ मध्ये डीपीआर अंतर्गत मंजुरी मिळाली. पुढे जानेवारी २०१६ मध्ये भूमिपूजन झाले. भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम २० अंतर्गत २०१७ मध्ये हे क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित करण्यात आले. नंतर १४ जुलै २०१७ मध्ये उच्चस्तरीय समितीची स्थापना झाली. जुलै २०१९ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण झाले.

सर्वांगसुंदर प्रकल्प
निसर्गाने मुक्त हस्ताने येथे उधळण केली आहे. या ठिकाणी १५ प्रकारच्या गवती प्रजाती आहेत. ४५० प्रकारच्या वनस्पती आणि ७० प्रकारचे वृक्ष आहेत. पक्षिवैविध्यही आहे. एकूण १६१ प्रजातींच्या पक्ष्यांचा येथे वावर असून १०५ पक्षी निवासी तर ४० स्थलांतरित पक्ष्यांचा वावर असतो. अंबाझरी तलावामध्ये १६ प्रजातींचे मासे आढळतात. फुलपाखरांच्या विविध प्रजातीही हमखास आढळतात. १०४ प्रकारची फुलपाखरे येथे मुक्तपणे भिरभिरत असतात.

हे आहेत धोके
या उद्यानाला सर्वाधिक धोका आगीचा आहे. या वनक्षेत्रातून उच्च दाबाची वीजवाहिनी गेली आहे. त्यामुळे आगीचा धोका कायम असतो. उद्यानाचे क्षेत्र मोठे आहे. बरेचदा घुसखोरी होते. अवैध मासेमारीचे प्रकार घडतात. सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पथक गस्तीवर असते. नाल्याच्या काठावरून माणसे आत प्रवेश करतात.

वन्यप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक येथे परवानगी घेऊन येत असतात. मात्र लॉकडाऊनपासून हा प्रकल्प बंद आहे. वन्यजीवांचा मुक्तसंचार आता अधिकच वाढला आहे. प्रदूषणात घट झाल्याने सकारात्मक परिणाम येथील वातावरणावर पडल्याचे डेप्यूटी कंझर्व्हेटर आॅफ फॉरेस्ट नागपूर प्रभू नाथ शुक्ल यांनी सांगितले.


या उद्यानाचे नागपूरच्या पर्यावरणात मोठे महत्त्व आहे. औद्योगिकीकरण प्रचंड वाढले आहे. पर्यावरणातील संतुलन कायम राखण्यात हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावत आहे. शुद्ध हवा, प्राणवायू मोठ्या प्रमाणावर येथे असल्याने सकाळी फिरणाऱ्यांची संख्याही या परिसरात कमी नाही.
जैवविविधतेचे अनेक पैलू आहेत. त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. अनेक प्राणी आणि पक्षी कमी होत आहेत. एकेकाळी तडस आणि लांडगे जंगलात मोठ्या प्रमाणावर होते. आज त्यांची संख्या घटली आहे. शहराभोवताल असलेल्या तलावांची संख्या घटली आहे. त्याचा परिणाम वन्य-जीवनमानावर होत आहे. जैवविविधतेत पूरक असणाºया अशा तलावांचे पुनरुज्जीवन व्हावे.
- विनीत अरोरा, सेक्रेटरी सृष्टी पर्यावरण मंडल

इस्रोच्या अहवालानुसार, पृथ्वीवरचे हिरवे आच्छादन घटत आहे. तलावांची संख्यादेखील घटतेय. नागपूरचा विचार केला तर आज फक्त चार तलाव शिल्लक आहेत. अंबाझरी तलाव आज ९९ टक्के सुरक्षित आहे. असे असले तरी तेथील अडचणी सरकारने लक्ष घालून दूर कराव्यात.
- जयदीप दास, मानद वन्यजीव रक्षक

 

Web Title: Biodiversity Day; Ambazari Biodiversity Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.