जैवविविधता संवर्धन ईश्वरीय कार्य

By admin | Published: March 29, 2015 02:32 AM2015-03-29T02:32:28+5:302015-03-29T02:32:28+5:30

ईश्वराने ही सृष्टी बनविली आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे. मानवीवृत्तीमुळे ही शृंखला तोडली जात आहे.

Biodiversity Promotion Godly Work | जैवविविधता संवर्धन ईश्वरीय कार्य

जैवविविधता संवर्धन ईश्वरीय कार्य

Next

नागपूर : ईश्वराने ही सृष्टी बनविली आहे. सृष्टीतील प्रत्येक घटकाचे महत्व आहे. मानवीवृत्तीमुळे ही शृंखला तोडली जात आहे. त्याचा परिणाम सृष्टीवर जाणवायला लागला आहे. जैवविविधता म्हणजे सृष्टीतील जीव व वनस्पती आहेत. याच्या संवर्धनाची खरी गरज आहे. जैवविविधता नष्ट झाल्यास मानव नष्ट होईल. त्यामुळे जैवविविधतेचे संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे, असे मत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सिव्हिल लाईन परिसरात जैवविविधता मंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) अनिलकुमार सक्सेना, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, विभागीय आयुक्त अनुपकुमार सिंग, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिलीप सिंह, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे के.के. नीलम, एएसके शर्मा आदी उपस्थित होते. नष्ट होत चाललेल्या, दुर्मिळ वनस्पती व जीवाच्या रक्षणासाठी जैवविविधता मंडळ कार्य करते. मंडळाची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली असून, २०१५ मध्ये मंडळाला स्वत:चे कार्यालय मिळाले आहे. याप्रसंगी जैवविविधता मंडळाने घेतलेल्या राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण वनमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दोन घडी पत्रिकेचीही प्रकाशन यावेळी झाले.
काम करण्याची भरपूर संधी
महाराष्ट्रात जैवविविधतेची जागरूकता फार उशिरा झाली. २००८ मध्ये कायदा पारित झाला. २०१२ मध्ये मंडळाची स्थापना झाली. या क्षेत्रात फार मोठे कार्य करण्यासारखे आहे. जैवविविधता ५० हजार वर्षांपासून जुळलेली आहे. त्यासाठी लोककला, लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांची गरज आहे. भरपूर काम आहे, मात्र मंडळाकडे संसाधने कमी आहे. मनुष्यबळ अपुरे आहे. निधीची तरतूद नसल्याचे प्रधान वनसंरक्षक अनिलकुमार सक्सेना यांनी वनमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.
सरकारी कार्यक्रम होऊ देऊ नका
या विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही, असा विश्वास वनमंत्र्यांनी दिला. मात्र जैवविविधता पुस्तकाबाहेर काढून लोकांमध्ये रुजविण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकसहभाग वाढवावा लागेल. मंडळाला आवश्यक असलेल्या १०८ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा, महिनाभरात मंडळाला अध्यक्ष देऊ. फक्त हा कार्यक्रम सरकारी होऊ देऊ नका. जैवविविधतेसाठी हे कार्यालय आदर्श ठरले पाहिजे, अशी भावना मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Biodiversity Promotion Godly Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.