जैवविविधता संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य
By admin | Published: May 23, 2017 01:53 AM2017-05-23T01:53:15+5:302017-05-23T01:53:15+5:30
जैवविविधता मानवाचे जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीत जैवविविधता आहे.
जागतिक जैवविविधता दिनानिमित्त कार्यक्रम : सुनील शुक्रे यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जैवविविधता मानवाचे जीवन आहे. जैवविविधतेशिवाय काहीही शक्य नाही. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीत जैवविविधता आहे. अनेक प्रजाती एक दुसऱ्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपण पदावर असो किंवा नसो, जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ व पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी जागतिक जैवविविधता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. धरमपेठ येथील वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात (वनामती) हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याच्या महसूल व वन विभागाचे सचिव विकास खारगे होते. मंचावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) भगवान, भारती विद्यापीठाचे संचालक डॉ. इराच भरुचा व प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. विनय सिन्हा उपस्थित होते. यावेळी शुक्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर डॉ. विनय सिन्हा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती दिली. दरम्यान शुक्रे यांनी वन विभागाची मुक्तकंठाने स्तुती करीत वन विभाग केवळ गोष्टीच करीत नाही, तर प्रत्यक्ष कृती सुद्धा करीत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी जैवविविधता आणि पर्यावरणासंबंधी सर्वोच्च न्यायालयात चाललेल्या खटल्यांचा दाखला देत जैवविविधता संरक्षणाचे आवाहन केले. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) भगवान यांनी जोपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेत गावांचा सहभाग राहणार नाही, तोपर्यंत जैवविविधता संरक्षण व संवर्धन शक्य नसल्याचे सांगितले. यासोबतच ईको-टुरिझममध्ये सुद्धा लोक सहभाग आवश्यक आहे.
सध्या आपण स्वत:च वन्यप्राण्यांच्या घरात (जंगलात) शिरत आहो. त्यांना अडथळा निर्माण करीत आहो आणि मग त्यांनी आमच्यावर हल्ला केला की, आम्हीच त्यांना ठार मारण्याची मागणी करतो. याशिवाय आपण निसर्गात कोणतीही प्रजाती उत्पन्न करू शकत नाही, त्यामुळे ती नष्ट करण्याचा सुद्धा आपल्याला कोणताही अधिकार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन यांनी आभार मानले.
जैवविविधता दुधारी शस्त्र
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी महाराष्ट्र हा जैवविविधतेने नटलेला प्रदेश असल्याचे सांगितले. ते म्हणाले, अशा प्रदेशात आपण राहतो, हे आमचे भाग्य आहे. जैवविविधतेमुळे विविध क्षेत्रात प्रचंड वाव आहे. मात्र तेवढीच बंधनेसुद्धा आहेत. जैवविविधता दुधारी शस्त्र असल्याचा यावेळी त्यांनी उल्लेख केला. या जैवविविधतेचा फायदाही होऊ शकतो, आणि तेवढाच धोकासुद्धा. त्यामुळे आपण त्याचा उपयोग कसा करतो, यावर ते अवलंबून आहे. पर्यटनामुळे जैवविविधता टिकेल, परंतु त्यासाठी शाश्वत पर्यटन असले पाहिजे. केवळ पैशाच्या मोहासाठी पर्यटन नको आणि याच उद्देशातून ईको-टुरिझम बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. जैवविविधतेला अनेक धोके आहेत. वातावरणातील बदल, प्रजाती नामशेष होणे, जंगलांचा ऱ्हास हे सर्व जैवविधितेपुढील आव्हाने आहेत, यामुळेच ती टिकविण्याची जबाबदारी वाढली आहे. केवळ कागदावर जैवविविधता व्यवस्थापन समित्या तयार करून चालणार नाही, तर त्यांचे सक्षमीकरणसुद्धा झाले पाहिजे. लोक सहभागाशिवाय जैवविविधतेचे जतन करणे शक्य नाही. त्यामुळेच लोक सहभागासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.