विषाणूने जातायेत जीव !
By admin | Published: August 31, 2015 02:44 AM2015-08-31T02:44:48+5:302015-08-31T02:44:48+5:30
राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे.
नागपूर विभागाचे वास्तव : पाच वर्षांत स्वाईन फ्लूने २२७ तर, डेंग्यूने १०९ रुग्णांचा मृत्यू
नागपूर : राज्यात विषाणूचा वाढता विळखा धोकादायक ठरत आहे. विशेषत: नागपूर विभागात डेंग्यू व स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. २०१० ते आतापर्यंत डेंग्यू लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३७४३ वर गेली आहे. यातील १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या मोठी आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूच्या साथीचा फैलाव होतो, हे नित्याचे आहे. परंतु याबाबत पूर्वकाळजी घेतली जात नाही. परिणामी दरवर्षी या आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येतात. अशीच स्थिती स्वाईन फ्लू बाबत आहे. आजार पसरू नयेत यासाठी शासनाच्यावतीने जी उपाययोजना आधीच करायला पाहिजे ती प्रभावीपणे राबविण्यात येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तज्ज्ञाच्या मते, महानगरपालिका व आरोग्य विभागाकडे या दोन्ही आजाराशी मुकाबला करण्याची विशेष यंत्रणाच नाही. यामुळे दरवर्षी या आजाराच्या रुग्णासह मृत्यूची संख्या वाढत आहे.
सहा महिन्यात स्वाईन
फ्लूच्या मृत्यूची संख्या १२६
नागपूर विभागात २०१० मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत अचानक वाढ होऊन मृत्यूची संख्या ५४वर गेली. २०११ मध्ये मृत्यूची नोंदच झालेली नाही. परंतु नंतर ही संख्या वाढत गेली. २०१२ मध्ये ९, २०१३मध्ये २८, २०१४मध्ये १० तर ३० जून २०१५ पर्यंत मृत्यूची संख्या १२६वर पोहचली.
गतवर्षी डेंग्यूने घेतले ४३ बळी
२०१० मध्ये डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १४ होती. २०११ मध्ये ८३ रुग्ण व ४ बळी गेले होते. २०१२ मध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊन ४२२वर पोहचली तर मृत्यूची संख्या १७ होती. २०१३ मध्ये रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली. १०९६ रुग्णांची नोंद झाली तर मृत्यूची संख्या ३५वर पोहचली. २०१४ मध्ये रुग्णांची संख्या २०९६ तर मृत्यूची संख्या ४३ झाली. जून २०१५ पर्यंत डेंग्यूचे ३२ रुग्ण आढळून आले तर एकाही मृत्यूची नोंद नाही.
स्वाईन फ्लूने १२७ महिलांचा मृत्यू
स्वाईन फ्लूमध्ये गेल्या पाच वर्षांत पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांच्या मृत्यूची संख्या मोठी आहे. २०१० मध्ये २१ पुरुष तर ३३ महिला, २०१२मध्ये पाच पुरुष तर ५ महिला, २०१३ मध्ये १९ पुरुष तर ९ महिला, २०१४ मध्ये ४ पुरुष तर ६ महिला तर सर्वाधिक मृत्यू या चालू वर्षात झाले. पुरुषांच्या मृत्यूची संख्या १०० झाली असून महिलांची संख्या १२७ वर गेली आहे.