नागपुरात ‘एमबीबीएस’ विद्यार्थ्यांसाठी आता बायोमेट्रिक प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 09:32 PM2018-01-13T21:32:29+5:302018-01-13T21:34:45+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यासाठी थेट वर्गात बायोमेट्रिक प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ७८ टक्के पदवीचे विद्यार्थी विविध तासिकांना गैरहजर राहत असल्याचे उघड झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्यासाठी थेट वर्गात बायोमेट्रिक प्रणाली व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ७८ टक्के पदवीचे विद्यार्थी विविध तासिकांना गैरहजर राहत असल्याचे उघड झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याची किमान ७५ टक्के हजेरी अत्यावश्यक आहे. मात्र, एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या केवळ २२ टक्केच विद्यार्थी विविध तासिकांना हजर राहतात. यावर उपाय म्हणून प्रशासनाने विद्यार्थ्यांची हजेरी वाढवण्यासाठी एका तासिकेला गैरहजर राहिल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही प्रमाणात वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली, परंतु गैरहजर विद्यार्थ्यांचा टक्का अद्यापही अधिक होता. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक तासिकेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वच वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक हजेरीची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सर्व यंत्रणा मार्च २०१८ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय अधीक्षकांचा राहणार ‘वॉच’
वर्गावर्गात लागणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर वैद्यकीय अधीक्षक लक्ष ठेवणार आहेत. या शिवाय कॅमेऱ्यांचे फुटेज विविध विभाग प्रमुखांच्या कक्षातही ते दिसतील अशी व्यवस्था राहणार आहे. विद्यार्थी गैरहजर असल्यास त्याची तातडीने नोंद घेतली जाणार आहे. त्याला जाबही विचारला जाणार आहे.
आठ सभागृहांची व्यवस्था
‘एमबीबीएस’चे विद्यार्थी आपले कौशल्य विकासाकरिता बाह्यरुग्ण विभागापासून ते आंतररुग्ण विभागात सेवा देतात. त्यांच्या सोयीसाठी व नियमित वर्गासाठी महाविद्यालयात आठ वेगवेगळ्या सभागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सुधारणेमुळे वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरी वाढण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्ग आवश्यक
शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून विद्यार्थ्यांनी नियमितपणे वर्ग करणे आवश्यक आहे. सध्या त्यांची हजेरी कमी असल्याने ती वाढवण्यासाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक यंत्र लावण्यात येईल. गैरहजर विद्यार्थ्यांना जाबही विचारला जाईल.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे,
अधिष्ठाता, मेडिकल