उपराजधानीत बायोमेट्रिकचा कुठे वापर तर कुठे नकार; कोरोनासाठी खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:09 AM2020-03-13T11:09:02+5:302020-03-13T11:12:13+5:30
उपराजधानीत विषाणू पसरण्याची शक्यता असल्याने अनेक केंद्रीय कार्यालयांनी आपापल्याकडील बायोमेट्रिक पद्धत काही दिवसांपुरती बंद ठेवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. संपूर्ण यंत्रणा उपाययोजनांच्या कामाला लागली आहे. हा विषाणू संसर्गजन्य आहे. सध्या सर्वत्र बायोमेट्रिक हजेरी पद्धत अवलंबिली जाते. यात व्यक्तीच्या अंगठ्याचे ठसे घेतले जातात. या माध्यमातूनही हा विषाणू पसरण्याची शक्यता असल्याने अनेक केंद्रीय कार्यालयांनी आपापल्याकडील बायोमेट्रिक पद्धत काही दिवसांपुरती बंद ठेवली आहे. तर काहींनी उपाययोजना म्हणून बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. परंतु जिल्हा व विभागीय स्तरावरील प्रशासकीय कार्यालये मात्र यापासून अलिप्त आहेत. त्यांनी अशी कुठलीही व्यवस्था केलेली नाही किंवा यासंदर्भात कुठल्या सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत. बँकांच्या सर्व शाखांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनजवळ सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर देण्यात आले आहेत. त्यानुसार आता राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या प्रत्येक शाखांमध्ये बायोमेट्रिक मशीनजवळील सॅनिटायझरचा उपयोग कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे.
‘डीआरएम’ कार्यालयात बायोमेट्रिक बंद
बायोमेट्रिक मशीनमुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून बायोमेट्रिक मशीन ३१ मार्चपर्यंत बंद केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ‘डीआरएम’ कार्यालयात एकूण १२०० कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना कार्यालयात आल्यानंतर हजेरी लावण्यासाठी बायोमेट्रिक मशीनचा वापर करणे सक्तीचे आहे. परंतु नागपुरात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्यामुळे रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. कर्मचाऱ्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून बायोमेट्रिक मशीन बंद केली आहे. कर्मचाºयांना आपली उपस्थिती दर्शविण्यासाठी रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ‘डीआरएम’ कार्यालयात लावण्यात आलेल्या बायोमेट्रिक मशीन सील करण्यात आल्या आहेत. याच्या शेजारी ३१ मार्चपर्यंत बायोमेट्रिक मशीन बंद राहणार असल्याची सूचना दिली आहे. नागपुरात अनेक ठिकाणी बायोमेट्रिक मशीन सुरू असताना रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. कोरोना व्हायरस बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून पसरु शकतो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी सांगितले.