सर्वच जलाशयांवर पक्ष्यांचा किलबिलाट ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:21+5:302021-01-15T04:09:21+5:30
नागपूर : जिल्ह्यातील सर्वच जलाशयांवर सध्या पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. यावर्षी हिवाळ्यात हाेणारे प्रवासी पक्ष्यांचे आगमन तसे उशिराच ...
नागपूर : जिल्ह्यातील सर्वच जलाशयांवर सध्या पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. यावर्षी हिवाळ्यात हाेणारे प्रवासी पक्ष्यांचे आगमन तसे उशिराच झाले. मात्र जानेवारीच्या सुरुवातीपासून संख्या वाढली आहे. स्थानिक आणि परदेशी पक्ष्यांचा अनाेखा संगम या काळात दिसून येत आहे. पक्षी निरीक्षणाची एक चांगली संधी यानिमित्ताने पक्षिप्रेमी व अभ्यासकांनाही मिळत आहे.
पक्षी अभ्यासक कीर्ती मंगरूळकर यांनी विविध तलावांवरील जमलेल्या पक्ष्यांचे निरीक्षण नाेंदविले आहे. रंगीबेरंगी, चिमणीच्या आकारापासून ते माेठ्या पक्ष्यांचे थवे पाण्यावरून उडताना विहंगम दृश्य नजरेस पडते. मंगरूळकर यांनी विशेषत: पाणवठ्यांवरील पक्ष्यांच्या नाेंदी केल्या आहेत. गाेरेवाडा, अंबाझरी, फुटाळा आदी तलाव या पक्ष्यांनी गजबजले आहेत. बार हेडेड गुज, रुडी शेल्डक, रेड क्रस्टर्ड पाेचार्ड, ओपन बिल स्टाॅक, पेंटेड स्टाॅर्क, कलहंस, कांड्या करकाेचा, साधा करकाेचा, नाॅर्दर्न पीनटेल, गारगणी, मलार्ड, नाॅर्दर्न शाॅवलर, टफ्टेड पाेचार्ड अशा प्रवासी पक्ष्यांसह किंगफिशर (खंड्या), रेड वॅटल्ड लॅपविंग (टिटवी), पाणकावळा, जांभळी पाणकाेंबडी, पाँड हेराॅन, जकाना (कमळ पक्षी) अशा स्थानिक पक्ष्यांचीही रेलचेल बघायला मिळत आहे.
निरीक्षण करताना घ्या काळजी
कीर्ती मंगरूळकर यांनी पक्षी निरीक्षण करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी वेबिनारचे आयाेजन त्यांनी केले आहे.
- आवाज करू नका व जवळ जाण्याचाही प्रयत्न करू नका. निरीक्षणासाठी शक्यताे बायनॅकुलरचा उपयाेग करा.
- जवळ जाऊन बघण्याचा अट्टहास नकाे. एका ठिकाणी स्तब्ध बसून संयमाने त्यांचे निरीक्षण करा.
- एकमेकांना दाखविताना ओरडू नका किंवा हातवारे करू नका. त्यापेक्षा ॲंगलने समजवा.
- त्या पक्ष्यांचे नाेटिंग करा.
अद्यापतरी इन्फ्लूएंजाची नाेंद नाही
प्रवाशी पक्ष्यांमुळे इन्फ्लूएंजा विषाणूचा प्रसार हाेताेय, हे खरे असले तरी नागपूर जिल्हा किंवा आसपासही अशी नाेंद झालेली नाही. विशिष्ट पक्ष्यात ताे दिसला असेही सांगता येत नाही. प्रवाशी पक्षी हजाराे किमीचा प्रवास करून येत असतात. वाटेत अनेक ठिकाणी मुक्काम हाेताे. त्यामुळे कुठेतरी लागण हाेण्याची शक्यता आहे. कावळ्यांच्या मृत्यूची बाब समाेर आली आहे. कावळे सहसा मृत जनावरांचे मांस खात असल्याने ती शक्यता आहे. तसेच बदक व काेंबडी प्रजातींच्या पक्ष्यांमध्ये त्याची शक्यता अधिक आहे. पण सगळ्या पक्ष्यांसाठी काळजीचे कारण नाही, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी.