बर्ड फ्लूची लागण पक्ष्यांना, फटका पोल्ट्री फार्मला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:07 AM2021-01-09T04:07:03+5:302021-01-09T04:07:03+5:30
नागपूर : ‘बर्ड फ्लू’ म्हणजे ‘पोल्ट्री फार्म’ असे समीकरण झाले आहे. देशात महाराष्ट्र वगळता सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका ...
नागपूर : ‘बर्ड फ्लू’ म्हणजे ‘पोल्ट्री फार्म’ असे समीकरण झाले आहे. देशात महाराष्ट्र वगळता सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका असल्याचे दिसून येत आहे. हा आजार कोंबड्यांना नव्हे तर पक्ष्यांमध्ये आढळून आला आहे. बर्ड फ्लूची लागण पक्ष्यांना झाली, फटका मात्र पोल्ट्री फर्मला बसत आहे.
या आजारामुळे पक्ष्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू झाला आहे. पण हा आजार कोंबड्यांना झाल्याच्या अफवेमुळे सर्वाधिक फटका पोल्ट्री फार्म व्यवसायाला बसला आहे. कोरोना महामारीच्या संकटातून सावरत कर्जातून नव्याने उभ्या राहिलेल्या या व्यवसायाला पुन्हा नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात पशुसंवर्धन मंत्र्यांनीही महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे बयाण जारी केले आहे, हे विशेष.
हा आजार स्थलांतरित पक्षांमध्ये आढळून आला आहे. या पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य पक्ष्यांचाही या आजाराने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात बर्ड फ्लूची अफवा पसरताच पोल्ट्री फार्मच्या संचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे गेल्या काही दिवसात मालाचे दर कमी झाले, पण त्या तुलनेत विक्री तेवढीच आहे. पोल्ट्री फार्मचे संचालक म्हणाले, बर्ड फ्यूची पोल्ट्री फार्ममध्ये काहीही भीती नाही. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्व फार्म सुरू आहेत. टीव्हीवर बर्ड फ्लू संदर्भात प्रसारित होणाऱ्या बातम्यांमध्ये संदर्भ म्हणून पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या दाखवितात. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम पसरला असून चुकीच्या बातम्यांमुळे या व्यवसायावर पुन्हा संकट येऊ नये, अशी व्यावसायिकांना चिंता आहे.
विदर्भ पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजा दुधभडे म्हणाले, पोल्ट्री फार्म हा शेतीपूरक व्यवसाय आहे. विदर्भात लहानमोठे ७०० पेक्षा जास्त पोल्ट्री फार्म असून दररोज ८ ते १० कोटींची उलाढाल होते आणि जवळपास १० हजार लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या या व्यवसायाशी जुळले आहेत. कोरोनानंतर महामारीनंतर डिसेंबरपासून हा व्यवसाय रुळावर आला असून राज्य शासनाच्या मदतीविना अनेकांनी घरचे दागदागिने विकून नव्याने उभा केला आहे. सत्यस्थिती लोकांसमोर न आल्याने बर्ड फ्लूच्या धास्तीने या व्यवसायावर नव्याने संकट उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वी भाव काही प्रमाणात कमी झाले, पण विक्री पूर्वीप्रमाणेच होती. गेल्या आठवड्यापासून भाव पूर्ववत झाले आहेत. यासंदर्भात पशुसंवर्धन मंत्र्यांचे वक्तव्य सकारात्मक आहे.
या व्यवसायाला लागणारे खाद्य सोयाबीन केक आणि मक्याचे भाव कमी झाले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. येथील पोल्ट्री फार्ममधून संपूर्ण विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगाणा येथे मालाची विक्री होते. टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या बातम्यांमध्ये या व्यवसायाची सत्यस्थिती प्रकाशित करावी, अन्यथा हा व्यवसाय पुन्हा डबघाईस येण्यास वेळ लागणार नाही. आता तर पोल्ट्री फार्म संचालकांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असे डॉ. दुधभडे म्हणाले.