सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा अधिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:56 AM2017-11-05T00:56:33+5:302017-11-05T00:56:54+5:30
विविध फळा-फुलांच्या झाडावर पक्ष्यांची कलकल, फुलाफुलांवर भ्रमण करणारे फुलपाखरू, एका फांदीवरून दुसºया फांदीवर हुंदडणारी खारुताई आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज ऐकू यावा अशी मोकळी सकाळ ...
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध फळा-फुलांच्या झाडावर पक्ष्यांची कलकल, फुलाफुलांवर भ्रमण करणारे फुलपाखरू, एका फांदीवरून दुसºया फांदीवर हुंदडणारी खारुताई आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आवाज ऐकू यावा अशी मोकळी सकाळ तुम्ही एवढ्यात अनुभवल्याचे आठवते काय? सिमेंटच्या जंगलात रूपांतरित झालेल्या शहरात अशा दृश्याची कल्पना करणेही दुर्लभ झाले आहे. मात्र झिंगाबाई टाकळी येथे राहणाºया जयंत तांदूळकर यांच्या घरी मनाला प्रसन्न करणारे असे दृश्य दररोज बघायला मिळते.
पक्ष्यांच्या सहवासाची प्रचंड आवड असलेल्या जयंत तांदूळकर यांनी पक्ष्यांसाठी श्रीकृष्णनगर, गोधनी रोड येथील त्यांच्या घरी एक अधिवासच निर्माण केला आहे. एक पक्षिमित्र म्हणून ओळख निर्माण झालेले तांदूळकर महालेखाकार कार्यालयात अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत. कोराडी रोडवरील कुमटी हे त्यांचे मूळ गाव. लहानपण गावात गेल्याने निसर्गाच्या सान्निध्याचा प्रभाव त्यांच्यावर आहेच. त्यामुळे शहरात राहण्यास आले तरी तो धागा त्यांच्याशी जुळला आहे. शहरातील या घरी त्यांचे कुटुंब राहायला आले तेव्हा परिसरात चिमण्याही दिसत नसल्याने ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी चिमण्यांसाठी घरी पाणी आणि धान्याची व्यवस्था केली. थोड्याच दिवसात त्याचा परिणाम दिसायला लागला. त्यांच्या घरी चिमण्यांचे आगमन सुरू झाले. एवढेच नाही तर इतरही पक्ष्यांचा किलबिलाट वाढल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला घराच्या मागे असलेला काकांचा मोकळा प्लॉट त्यांना सोईस्कर झाला होता. या मोकळ्या जागेत त्यांनी पक्ष्यांसाठी अधिवासच निर्माण केले होते. मात्र हा प्लॉट विकल्यानंतर त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला. यावर तोडगा म्हणून त्यांनी घराच्या टेरेसवर छोट्या जागेत तशीच व्यवस्था केली. हा बदलही पक्ष्यांना भावला. धान्य आणि पाण्यासाठी असलेले भांडे त्यांनी झाडाजवळच ठेवले आहे.
एका पक्षितज्ज्ञाला घरी बोलावले असता एक-दोन नव्हे तर तब्बल ४० प्रजातीचे पक्षी त्यांना आढळून आल्याचे जयंत यांनी सांगितले. त्यामुळे काही पक्ष्यांनी झाडावरच घरटी बांधली आहेत. पक्ष्यांद्वारे घरट्यामधील पिल्लांना घास भरविण्याचे दृश्य येथे बघायला मिळते. आपल्या व्यस्त दैनंदिन जीवनातही पक्ष्यांचा लळा त्यांनी सोडला नाही. ते सकाळी उठतात. पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी आणि धान्याचे भांडे ते स्वच्छ करतात. त्यानंतर त्यात नव्याने धान्य आणि पाणी ठेवतात. बाजरी, कणकी आणि गवताचे बीज असे जैविक खाद्य पक्ष्यांसाठी ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.
४० प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश
बांबूच्या भांड्यात दाणे टाकल्याबरोबर सर्वात आधी सिल्व्हर बिल हा छोट्याशा घोळका येथे जमा होतो. त्यानंतर सर्वांना परिचित असलेल्या चिमण्या, मॅगपाय रॉबिन, इंडियन रॉबिन, ग्रीन बी-इटर बार्बेट, लॉफिंग डाईव्ह(भोवरी), व्हाईट ब्रॉड बुलबुल, किंगफिशर असे अनेक प्रकारचे पक्षी येथे जमा होतात. अनेक प्रकारच्या प्रवासी पक्ष्यांची भेटही येथे होत असते. एका पक्षितज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार येथे ४० प्रकारचे पक्षी येत असल्याचे तांदूळकर यांनी सांगितले. याशिवाय विविध रंगांचे फुलपाखरू, खारुताई यांचे खेळणे-बागळणे येथे नेहमीच चालते.
कुटुंबात असतो उत्साह
हे पक्षी दररोज घराच्या छतावर येतात व सकाळपासून त्यांचा किलबिलाट सुरू होतो. ते येतात, दाणे टिपतात, भुर्रकन उडतात, थोडे ऊन निघाले की भांड्यात ठेवलेल्या पाण्यात आंघोळ करतात. मुलांना त्यांचे विशेष आकर्षण आहे. पत्नी प्रज्ञा, आई-वडील यांचा पक्ष्यांच्या सरबराईत सहभाग असतो. या पाहुण्यांमुळे घरात एकप्रकारचा उत्साह वावरत असल्याची भावना जयंत तांदूळकर यांनी व्यक्त केली.