एक पक्षी झाडावरून पडलाय हो... खाकी वर्दीतूनही प्रगटले पक्षिप्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 09:14 PM2020-04-25T21:14:50+5:302020-04-25T21:15:20+5:30
सतरंजीपुऱ्यातून शनिवारी दुपारी ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये कॉल आला. ‘मी सतरंजीपुऱ्यातून बोलतोय.’, असे ऐकताच सर्वांनी कान टवकारले. मात्र एका पक्ष्याला वाचविण्यासाठी तो कॉल असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला, आणि पुढच्या क्षणी येथील पथक पक्ष्याला वाचविण्यासाठी निघाले !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील सतरंजीपुरा सध्या शहरात कोरोनाचा हॉटस्पॉट झालायं. येथे जायला सारेच घाबरतात. येथून आलेला कॉल म्हणजे शासकीय यंत्रणेसाठी दक्षतेची घंटाच असते. याच सतरंजीपुऱ्यातून शनिवारी दुपारी ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये कॉल आला. ‘मी सतरंजीपुऱ्यातून बोलतोय.’, असे ऐकताच सर्वांनी कान टवकारले. मात्र एका पक्ष्याला वाचविण्यासाठी तो कॉल असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला, आणि पुढच्या क्षणी येथील पथक पक्ष्याला वाचविण्यासाठी निघाले !
शनिवारी दुपारी आलेल्या या कॉलने आधी तर ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील सर्वांच्याच मनात धडकी भरली. एखादा प्राणी कोरोनाच्या सावटात आला की काय, अशीही शंका मनाला स्पर्शून गेली. मात्र कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण पोलीस असून सतरंजीपुऱ्यामध्ये ड्युटीवर असल्याचे सांगितले. काही वेळापासून एक पक्षी झाडावरून पडला असून त्याला आम्ही बऱ्याच वेळापासून पहातोयं, कुण्या कुत्र्याने अथवा मांजरीने मारू नये म्हणून लक्ष देतोय. तुम्ही लवकर या आणि त्याला तुमच्या सेंटरमध्ये उपचारासाठी न्या, असे या पोलिसाने मोबाईलवरून पलिकडून सांगितले.
सतरंजीपुरा आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला. अशा स्थितीत तिथून एका पक्ष्यासाठी पोलिसाचा आलेला कॉल ऐकून येथील पथक सरसावले. सतरंजीपुऱ्यातून कुठलाही प्राणी किंवा पक्षी आणणे म्हणजे स्टाफला थोडी भीती होतीच. पण भीतीवर कर्तव्याने मात केली. वनपाल सपना टेंभरे, येथील डॉक्टरांचा सहयोगी समीर नेवारे आणि चालक आशिष महल्ले त्याला आणायला पोहचले. त्यांनी पक्ष्याला पोलिसांकडून ताब्यात घेतले आणि सेंटरमधील आयसोलेशन वॉर्डात उपचारासाठी आणले. तिथे त्याला सिरिंजमधून पाणी आणि औषध देण्यात आले. आता त्याची प्रकृती सुधारत आहे. उन्हामुळे असे बरेच पक्षी उपचारासाठी येत असले तरी सतरंजीपुऱ्यातून आलेला हा ‘पेशंट’ येथील सर्वांच्या आठवणीत राहणारा ठरला आहे.