नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात राबविणार पक्षी सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:33 AM2020-10-28T00:33:53+5:302020-10-28T00:35:02+5:30
Bird week in November , nagpur newsराज्यातील पक्षिप्रेमी संघटना आणि राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांच्या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पक्षी सप्ताह रावविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान या सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्यातील पक्षिप्रेमी संघटना आणि राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांच्या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पक्षी सप्ताह रावविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान या सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे.
राज्याच्या महसूल व वन विभागाने या निर्णयाची घोषणा करीत या संदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. विशेष म्हणजे, पक्षिमित्र डॉ. सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला येते, तर पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा वाढदिवस ५ नोव्हेंबरला येतो. हे औचित्य साधून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. नोव्हेंबर महिना पक्षी स्थलांतराच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. राज्यात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी याच महिन्यात विविध जलाशयांवर तसेच जंगलामध्ये येतात. अनेक पक्ष्यांचा हा विणीचा काळ असतो. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वास्तव्याच्या काळात पक्षी अभ्यासकांसाठी ही संधी असते. त्यामुळे ५ ते१२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जावा, अशी मागणी पक्षिप्रेमी संस्था व राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांकडून होत होती. त्याची दखल घेऊन हा निर्णय झाला आहे.
पक्षी संवर्धनासाठी होणार जनजागृती
या सप्ताहाच्या काळामध्ये नागरिक, विद्यार्थी यांच्यामध्ये जनजागृती केली जाणार आहे. पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व, संकटग्रस्त पक्षी व त्यांचे अधिवास, पक्ष्यांचे स्थलांतरण व त्यांचे अधिवास संरक्षण, पक्षी संरक्षण संवर्धन कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांना पोहोचण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
पक्षी छायाचित्र प्रदर्शन, पक्षी छायाचित्र स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यासाठी चित्रकला व निबंध स्पर्धा, कार्यशाळा, माहितीपट इत्यादीचे आयोजन होणार आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास असलेल्या ठिकाणी पक्षीनिरीक्षणाचे आयोजन करणे, पक्षीगण, अधिवास स्वच्छता, पक्षी अभ्यास असे कार्यक्रम आखले जाणार आहेत.
शासकीय यंत्रणांना सहभागी करणार
पक्षी व त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाच्या दृष्टीने केवळ वन विभागावर अवलंबून राहता संबंधित विभागांचीही मदत घेतली जाणार आहे. जलसंपदा, कृषी व पोलीस विभाग यांनाही यात सहभागी केले जाणार आहे. तसेच इतर शासकीय यंत्रणांना यात सहभागी करून पक्षी संवर्धनात सर्वांचेच सहकार्य घेतले जाणार आहे.