महाराष्ट्रातील पक्ष्यांचा मराठी पक्षिकाेश हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:10+5:302021-08-29T04:11:10+5:30

निशांत वानखेडे नागपूर : आजघडीला पक्ष्यांची माहिती सांगणारी बरीच पुस्तके मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. मात्र या सर्व पक्ष्यांची इत्थंभूत ...

The birds of Maharashtra will have Marathi birds | महाराष्ट्रातील पक्ष्यांचा मराठी पक्षिकाेश हाेणार

महाराष्ट्रातील पक्ष्यांचा मराठी पक्षिकाेश हाेणार

Next

निशांत वानखेडे

नागपूर : आजघडीला पक्ष्यांची माहिती सांगणारी बरीच पुस्तके मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. मात्र या सर्व पक्ष्यांची इत्थंभूत अशी एकत्रित माहिती देणारे पुस्तक नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या प्रयत्नातून राज्यभरातील १००-१५० पक्षिमित्रांनी एकत्रित येत पक्षिकाेश तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. या विश्वकाेशामध्ये ५७७ पक्ष्यांची सविस्तर माहिती मराठीतून उपलब्ध केली जाणार आहे.

बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री साेसायटीच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात ५७७ प्रजातींचे पक्षी आहेत. नव्या पक्षिकाेशामध्ये पक्ष्यांच्या जन्मापासून महत्त्वाच्या घडामाेडींची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गाेंदियाचे अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या संकल्पनेतून हा पक्षिकाेश साकार हाेत आहे. महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष व मराठी पक्षिकाेश संपादक मंडळाचे सदस्य डाॅ. जयंत वडतकर यांनी सविस्तर माहिती दिली. प्रत्येक पक्ष्याचे वास्तव्य कुठे, स्थानिक की स्थलांतरित, त्याचे घरटे कसे, प्रजननाचा काळ, पिल्ले कधी हाेतात, ताे दिसताे कसा, त्याचा आवाज कसा असताे अशी सगळी माहिती सहज साेप्या मराठी भाषेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न या पक्षिकाेशातून केला जात आहे. शहरी, ग्रामीण, तलावावरच्या, माळरानावरच्या, जंगलातील अशा सर्व पक्ष्यांची माहिती त्यात असेल. ही सर्व माहिती एका पुस्तकात सामावणार नाही, त्यामुळे किमान तीन खंड हाेण्याची अपेक्षा डाॅ. वडतकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील सर्व पक्षिमित्रांना या पक्षिकाेशासाठी माहिती संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले हाेते. यामध्ये प्रत्येक पक्ष्यावर लिहिण्याची तयारी अनेक पक्षिमित्र, अभ्यासक यांनी दर्शविली आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र पक्षिमित्र व संघटनेचे अनेक सभासदसुद्धा सहकार्य करणार असून सर्वांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.

अरण्यऋषिंचा पक्षी विश्वकाेश

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे ‘पक्ष्यांचे विश्वकाेश’ हे पुस्तक मराठीतील एक अनमोल खजिनाच आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पक्ष्यांची थोडक्यात माहिती आणि विविध प्रांतातील आणि भाषेतील त्यांची नावे दिलेली असून, हा ग्रंथ पक्ष्यांविषयीच्या माहितीचा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. नव्या पक्षिकाेशामध्ये प्रत्येक वास्तव्य कुठे, त्याचे घरटे कसे, प्रजननाचा काळ, पिल्ले कधी हाेतात, ताे दिसताे कसा, त्याचा आवाज कसा असताे अशी सगळी माहिती उपलब्ध करण्यात येईल. हा खऱ्या अर्थाने प्रत्येक पक्ष्याचा मराठीतील विकिपीडिया ठरणार आहे.

स्थानिक पक्षिमित्रांच्या अभ्यासावर आधारित हा पक्षिकाेश असणार आहे. मराठीत सर्व पक्ष्यांची एकत्रित माहिती असल्याने ताे सर्वांना आपला वाटेल. याद्वारे महाराष्ट्रातील सर्व पक्ष्यांची नाेंद हाेईल आणि सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही त्यांचा अभ्यास करण्यास लाभदायक ठरेल.

- डॉ जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षिमित्र

Web Title: The birds of Maharashtra will have Marathi birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.