आता मेयो, मेडिकलमध्ये मिळणार जन्म-मृत्यू प्रमाणपत्र
By गणेश हुड | Published: May 26, 2023 06:46 PM2023-05-26T18:46:30+5:302023-05-26T18:47:26+5:30
Nagpur News १ जून २०२३ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे होणारे जन्म आणि मृत्यूंच्या घटनांची नोंदी या दोन्ही रुग्णालयांमध्ये होतील. येथूनच प्रमाणपत्रही मिळणार आहे.
गणेश हूड
नागपूर : नागपूर शहरातीलजन्म-मृत्यूच्या नोंदी महापालिकेच्या झ्रोन कार्यालयात केल्या जातात. नोंदणीच्या ठिकाणीच प्रमाणपत्र दिले जाते. मात्र १ जून २०२३ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे होणारे जन्म आणि मृत्यूंच्या घटनांची नोंदी या दोन्ही रुग्णालयांमध्ये होतील. येथूनच प्रमाणपत्रही मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या निर्देशान्वये मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दोन्ही रुग्णालय प्रशासनाला यासंर्भात अंमलबजावणी करण्याबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार १ पासून शहरातील मेडिकल आणि मेयो मध्ये होणारे जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद तेथेच ऑनलाईन माध्यमातून केली जाईल. तर मनपा रुग्णालयांसह नागपूर शहरातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये होणारे जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी आधीप्रमाणे महापालिकेच्या संबंधीत झोन मध्ये केली जाईल.
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांच्या प्रमुखांना जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या आरोग्य संस्थांची इमारत अथवा इमारतीच्या आवारात घडलेल्या सर्व जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करणे अपेक्षित असल्याचे आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांच्या पत्रात नमूद आहे. त्यानुसार www.crsorgi.gov.in या संकेतस्थळावर संबंधित आरोग्य संस्थांनी जन्म मृत्यूची घटनांची नोंदणी करणे व त्यांचे प्रमाणपत्र निर्गमित करणे अनिवार्य आहे.
शहरातील मेडिकल आणि मेयो प्रशासनाने ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करून त्यांच्या रुग्णालयांमध्ये जन्म आणि मृत्यू घटनांची नोंदणी सुरू झाल्याबाबतचा अहवाल ८ दिवसांच्या आत उपसंचालक आरोग्य सेवा (आमाजीआ) पुणे तथा उपमुख्य निबंधक जन्म मृत्यू कार्यालयास सादर करावयाचा आहे.