जिल्हा काँग्रेस साजरी करणार इंदिराजींची जन्मशताब्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:30 AM2017-09-11T01:30:44+5:302017-09-11T01:31:00+5:30
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला़....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला़ तरुण पिढी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत इंदिराजींचे विचार पोहचविणे, त्यांनी केलेल्या कामांची माहिती पोहचविण्याची मोहीम राबविण्यात येणार असून याशिवाय विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.
अ़ भा. काँग्रेस कमिटीचे महासचिव माजी मंत्री मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक झाली. तीत माजी आमदार देवराव रडके, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, उपाध्यक्ष रमेश जोध, महिला अध्यक्ष तक्षशिला वागधरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते़
यावेळी राजेंद्र मुळक यांनी प्रास्ताविकातून इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष व ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले़ इंदिरा गांधी यांच्या क्रांतिकारी जीवनाचा आणि इतिहासाला कलाटणी देणाºया अनेक धाडसी निर्णयांचा आजच्या तरुण पिढीला अभ्यास व्हावा, माहिती व्हावी यासाठी तालुका पातळीवर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत़ त्यात प्रामुख्याने वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, परिसंवाद, व्याख्यान आदींचा समावेश राहील.
या शिवाय ‘स्लाईड शो’ च्या माध्यमातून इंदिराजींचे जीवनदर्शन ग्रामस्थांना घडविण्यात येईल. विदर्भ आणि इंदिराजी यांचे नाते अतूट असून त्या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठी एक पुस्तकही प्रकाशित केले जाईल. १९ नोव्हेबर २०१७ पर्यंत हे सर्व कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत़, असे मुळक यांनी यावेळी सांगितले.
इंदिरा गांधी जन्मशताब्दीनिमित्त आयोजित होणाºया प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभागी व्हा, असे आवाहन करीत या सर्व कार्यक्रमांना आपण सहकार्य करू, अशी ग्वाही मुकुल वासनिक यांनी दिली. बैठकीला संजय मेश्राम, दीपक काटोले, चंद्रपाल चौकसे, कुंदा राऊत, शिल्पा जवादे, सादिक शेख, हुकूमचंद आमधरे, शाजा सफाअत अहमद, वसंत गाडगे, सुरेश कुमरे, ज्योत्स्ना कुमरे, वैशाली मानवटकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक व सर्व सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा
जिल्ह्यात १४ आॅक्टोबर रोजी २८२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. या पार्श्वभूमिवर बैठकीत सद्यस्थिती व तयारीचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील राजकीय चित्र मांडले. निवडणूक जिंकण्यासाठी कशी तयारी करावी लागेल, याबाबत सूचनाही केल्या. यावर जिल्हा काँग्रेस ग्राम पंचायत निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे मुळक यांनी आश्वस्त केले.