गर्भाच्या ‘जेनेटिक एडिटिंग’ने सुदृढ बालकाचा जन्म शक्य - संशाेधक स्मिता पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:57 AM2023-01-14T11:57:58+5:302023-01-14T11:58:24+5:30
मानवी अस्तित्वासाठी ‘जीएम’शिवाय पर्याय नाही
निशांत वानखेडे
नागपूर : सुदृढ बालक जन्माला येणे ही आनंदाची गाेष्ट आहे व म्हणूनच ताे प्रत्येक पालकाचा अधिकारही आहे. जन्माला आल्यानंतर त्याचा आजार किंवा दाेष दूर करणे अडचणीचे असते; पण गर्भात असताना ताे दूर करणे ‘जेनेटिक इंजिनीअरिंग’ तंत्रज्ञानाने शक्य आहे. गर्भाच्या पहिल्या काही आठवड्यात ‘जेनेटिक एडिटिंग’द्वारे दाेषपूर्ण जीन्स काढून आजाररहित बालक जन्माला येणे शक्य आहे. आज नैतिक-अनैतिक या चर्चा हाेत असल्या तरी जेनेटिक एडिटिंग ही भविष्याची गरज आहे, असे स्पष्ट मत उस्मानिया विद्यापीठाच्या जेनेटिक इंजिनीअरिंग ॲण्ड बाॅयाेटेक्नालाॅजी विभागाच्या प्राध्यापक डाॅ. स्मिता पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे आयाेजित आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेत सहभागी झालेल्या डाॅ. स्मिता यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना या क्षेत्रातील संशाेधनावर प्रकाश टाकला. चीनमध्ये ‘नीना’ आणि ‘लूलू’ या दाेन ‘डीएनए सुधारित’ बालकांना जन्माला घालण्यात आले आहे. या दाेन्ही बालकांच्या डीएनएमधून एचआयव्ही विषाणूच्या निर्मितीस कारणीभूत जनुक काढण्यात आले. अमेरिकेत ‘ब्राकाजीन्स’ वर संशाेधन यशस्वी झाले आहे. हे स्तन कर्कराेगास कारणीभूत ठरणारे जीन्स आहेत. गर्भामध्ये जेनेटिक एडिटिंगने हे जीन्स काढले तर जन्माला येणाऱ्या बाळाला भविष्यात स्तन कर्कराेग हाेण्याचा धाेका राहणार नाही. आज आपल्या देशात गर्भाच्या जनुकीय सुधारणेला मान्यता नसली तरी भविष्यात हे तंत्रज्ञान सुदृढ बालकांच्या जन्मासाठी निर्णायक ठरेल, असा आशावाद डाॅ. स्मिता यांनी व्यक्त केला.
‘जीई’मुळेच काेराेनाची लस शक्य झाली
जेनेटिक इंजिनीअरिंगमुळेच एका वर्षात काेराेनाविरुद्ध लस तयार करणे शक्य झाले. वेगवेगळ्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी जीई तंत्रज्ञान अतिशय लाभदायक ठरणारे आहे. या तंत्रज्ञानाने बाॅयाेवाॅरचा धाेका आहे, पण ते मानवी विकृतीवर अवलंबून आहे. सध्या फायदे अधिक आहेत.
जीएम अन्नाला परवानगी द्यावीच लागेल
भारतात बीटी-काॅटन वगळता काेणत्याच जनुकीय सुधारित (जीएम) वाणाला मान्यता नाही. इतर देशांनी ती दिली आहे. जवळच्या बांगलादेशनेही ती दिली आहे. परदेशातून येणारे अन्न कदाचित जीएम असेल. आपण त्यापासून परावृत्त राहू शकत नाही. काही वर्षांत भारताची लाेकसंख्या चीनलाही मागे टाकेल. तेव्हा अन्नाची गरज भागविण्यासाठी जीएम अन्नाचीच गरज पडेल. मानवी अस्तित्वासाठी जीएम महत्त्वाचे आहेत.
आपण माकडाचे वंशज नाही
जनुकीय समानतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली, हे गृहितक मान्यता पावले आहे. मात्र, नवीन संशाेधनात हे गृहीतक खाेटे ठरत आहे. उलट हजाराे वर्षापूर्वी एप्स माकड व मानवाचे पृथ्वीवर एकाचवेळी अस्तित्व हाेते, असे संशाेधनातून समाेर आले असल्याची माहिती डाॅ. स्मिता पवार यांनी दिली.