नागपूर शहरात वाढला मुलींचा जन्मदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:01 AM2019-08-29T11:01:38+5:302019-08-29T11:04:01+5:30
जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. एक हजार मुलांमागे ९६७ मुली असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी राबविण्यात येत असलेल्या जनजागृती अभियानाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले आहे. एक हजार मुलांमागे ९६७ मुली असल्याचे सर्वेक्षणात निदर्शनास आले आहे. सदर येथील रोगनिदान केंद्र येथे पीसीपीएनडीटीअंतर्गत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
यावेळी मनपाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, सदर रोगनिदान केंद्राच्या डॉ. शिल्पा जिचकार, डॉ. अंजुम बेग,कल्पना वानखेडे, प्रदीप कुंभारे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी,परिचारिका, आशासेविका, टीबी कर्मचारी आदी उपस्थित होते.
मुलींचे जन्मदर कमी होण्यामागे समाजातील मानसिकता जबाबदार आहे. शहरात लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी मनपातर्फे वेळोवेळी जनजागृती केली जाते. सर्व डॉक्टर्सचे प्रशिक्षणही घेण्यात येते. याशिवाय सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांचे प्रबोधन करण्यात येते. याचे फलित म्हणून शहरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार एक हजार मुलींमागे ९२६ एवढे मुलींचे प्रमाण होते, तर जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये एक हजार मुलींमागे ९६७ एवढे जन्मदराचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली.
शहरामध्ये पीसीपीएनडीटी नियमांचे व्यवस्थित पालन केले जाते. शिवाय आरोग्य विभागातील अधिकारी दर तीन महिन्यांनी शहरातील ६३० सोनाग्राफी केंद्राला भेट देऊन तपासणी करतात. त्याचेच यश आज शहरातील मुलींच्या वाढत्या जन्मदराद्वारे दिसून येत असल्याचे भावना सोनकुसळे यांनी सांगितले.
पीसीपीएनडीटीअंतर्गत नोंदणी असलेल्या शहरातील एकूण ७९२ उपकरणांना एमआरसी क्रमांक देण्यात येत आहे. यामध्ये ७२३ सोनोग्राफी उपकरणे तरे १७ एमआरआय, ४३ सीटी स्कॅन, ९ बी स्कॅन या उपकरणांचा समावेश आहे. शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढणे ही आनंददायी बाब आहे. सामाजिक मानसिकता बदलत असल्याचे यावरून दिसून येत आहे. मात्र शहरातील सोनोलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञ यांनीही सजग राहणे आवश्यक आहे. कुणीही लिंगनिदान करू नये व इतरत्र कुठेही होऊ नये, याची सर्वांनी जबाबदारीने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी केले. एखादी डॉक्टर सोनोग्रॉफी करून गर्भातील लिंग चाचणी करून मुलगा किंवा मुलगी असल्याचे सांगत असल्यास, त्याचे नाव विभागाला कळवावे. ते सिद्ध झाल्यास माहिती देणाºयाला शासनातर्फे एक लाख रुपये बक्षीस जाहीर आहे. याशिवाय डिकॉय केस यशस्वी झाल्यास शासनातर्फे २५ हजार रुपये व डॉक्टर्सच्या आयएमए संस्थेतर्फे बक्षीस देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.