नागपुरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:51 PM2019-09-27T22:51:50+5:302019-09-27T22:55:03+5:30

सन २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदाराचे प्रमाण वाढले आहे.

The birth rate of girls in Nagpur has increased | नागपुरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले

नागपुरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले

googlenewsNext
ठळक मुद्देएक हजार मुलांमागे ९६८ मुलीपीसीपीएनडीटी बैठकीत माहिती सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या जनजागृती अभियानाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदाराचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी मनपा मुख्यालयातील उपसंचालक (आरोग्य) यांच्या कक्षात पीसीपीएनडीटी अंतर्गत झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
मुलींचे जन्मदर कमी होण्यामागे समाजातील मानसिकता जबाबदार आहे. शहरात लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी जनजागृती केली जाते. सर्व डॉक्टर्सचे प्रशिक्षणही घेण्यात येते. याशिवाय सोनोग्रॉफी करणाऱ्या डॉक्टर्सचेही प्रबोधन करण्यात येते. त्याचेच फलित म्हणून शहरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या सन २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहरात एक हजार मुलींमागे ९२६ एवढे मुलींचे प्रमाण होते तर जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपुरात एक हजार मुलींमागे ९६८ एवढे जन्मदराचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली. हे केवळ शहरातील सोनोग्राफी सेंटर व गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या सकारात्मक भूमिकेमुळे शक्य झाले असल्याचे सांगत सर्वप्रथम त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव बैठकीमध्ये ठेवण्यात आला.
बैठकीमध्ये नवीन सोनोग्राफी सेंटरसाठी आलेले सात अर्ज सादर करण्यात आले होते. त्यापैकी तीन अर्ज कागदपत्रांअभावी नाकारण्यात आले. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून पुढील बैठकीत अर्ज सादर करावे, असे निर्देश सल्लागार समितीने दिले. सोनोग्राफी सेंटर नूतनीकरणासाठी पाच अर्ज प्राप्त झाले होते. याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
आरोग्य उपसंचालक तथा पीसीपीएनडीटीच्या नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा ढवळे, डॉ. चैतन्य शेंबेकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय मराठे, रेडीओलॉजिस्ट डॉ. प्रशांत ओंकार, वीणा खानोरकर, डॉ. कीर्तीदा अजमेरा, डॉ. वासंती देशपांडे, मनपाचे विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: The birth rate of girls in Nagpur has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.