रात्री बर्थडे सेलिब्रेशन, पहाटे घेतला गळफास ! तरुणाची धक्कादायक एक्झिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 22:00 IST2023-05-02T21:59:48+5:302023-05-02T22:00:14+5:30
Nagpur News रात्री वाढदिवसाची पार्टी करून पहाटे गळफास लावून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे घडली.

रात्री बर्थडे सेलिब्रेशन, पहाटे घेतला गळफास ! तरुणाची धक्कादायक एक्झिट
नागपूर : कामात, अभ्यासात हुशार... स्वभावही बोलका. लहानपणापासून ताे येथील मोठे वडिलांकडे शिकला. रविवारी (दि. ३०) त्याचा वाढदिवस होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याने सर्वांसोबत हसत-खेळत ‘बर्थडे सेलिब्रेशन’ केले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गळफास घेत त्याने आत्महत्या केली. स्थानिक ऑफिसर कॉलनी येथे २३ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.
श्रेणिक बाबाराव लांबाडे (२३) असे मृत तरुणाचे नाव असून, ताे शेखापूर ता. हिंगणघाट, जि. वर्धा येथील मूळ रहिवासी हाेता. मृत श्रेणिक लहानपणापासूनच भिवापूर येथील ऑफिसर कॉलनीत राहणारे मोठे वडील तुकाराम ठाकरे यांच्याकडे शिकला. त्यामुळे शहरात त्याचे मित्र व परिचितांची यादी मोठी आहे. मागील दीड वर्षापूर्वी तो आपल्या शेखापूर येथे आई-वडिलांकडे राहायला गेला होता. आता उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने महिनाभरापूर्वी श्रेणिक भिवापूर येथे माेठ्या वडिलांकडे आला हाेता.
घटनेच्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ताे लगतच्या मेंढेगाव येथे मित्रांसाेबत डेकोरेशनच्या कामात होता. घरी परतल्यानंतर श्रेणिकने कुटुंबीय व मित्रांसाेबत केक कापत वाढदिवस साजरा केला. जेवण केल्यानंतर रात्री १२ वाजेपर्यंत तो मोबाइल बघत होता. कुटुंबीय झोपी गेल्यानंतर श्रेणिकने स्टोअर रूममध्ये छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. पहाटे ४ वाजेच्या सुमारास हा प्रकार दिसून येताच कुटुंबीयांनी हंबरडा फाेडला. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. भिवापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या सुपुर्द करण्यात आला. त्याच्यावर शेखापूर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
फोन करून केक कापायला बाेलावले...
मृत श्रेणिकचे घराशेजारच्या निरंजन बिरे या डेकोरेशन व्यावसायिकाशी जिव्हाळ्याचे सबंध असल्याने तो डेकोरेशनच्या कामात त्यांना मदत करायचा. घटनेच्या दिवशीही ताे त्यांच्यासोबत डेकोरेशनच्या कामात व्यस्त होता. सायंकाळी घरी परतल्यानंतर श्रेणिकने स्वत: फोन करून निरंजनला कुटुंबासह केक कापण्यासाठी घरी बोलावले होते. यावेळी तो खूश होता. असे काही करेल, कुणालाच वाटत नव्हते. असे मत निरंजन बिरे यांनी व्यक्त केले. सर्व काही आनंदी आनंद असताना अचानक त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला असावा, हा प्रश्नच आहे.