नागपुरात ‘कोरोना’ संकटात गुंडांकडून वाढदिवसाचा गोंगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:24 AM2020-06-12T00:24:30+5:302020-06-12T00:27:24+5:30
एकीकडे ‘कोरोना’चे संकट असतानादेखील प्रचंड गोंगाट करणाऱ्या गुंडांनी हटकणाऱ्यांवरच हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. केक कापताना हटकले म्हणून त्यांनी हटकणाऱ्याच्या घरावर दगडफेक करून बापलेकास मारहाण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे ‘कोरोना’चे संकट असतानादेखील प्रचंड गोंगाट करणाऱ्या गुंडांनी हटकणाऱ्यांवरच हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. केक कापताना हटकले म्हणून त्यांनी हटकणाऱ्याच्या घरावर दगडफेक करून बापलेकास मारहाण केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. कैलास खेडकर, गौरव मंजीराम घरजाळे, समीर जमाल खान, भावेश विनायक उज्जेनकर, फैजान इक्बाल शेख आणि रमण रमेश गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.
हे सर्व नवीन बाबुळखेड्यातील निजामी मशिदीजवळ राहतात. आरोपी समीर खान गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याचा ११ जूनला वाढदिवस असल्याचे निमित्त साधून १० जूनच्या मध्यरात्री आरोपी त्याच्या घराजवळ जमले. तेथे वाढदिवस साजरा करीत असताना ते जोरात ओरडत होते. गोंगाट ऐकून बाजूला राहणारे किशोर शितोळे यांनी त्यांना हटकले आवाज कमी करा, शांततेने वाढदिवस साजरा करा, असा वडिलकीच्या नात्याने त्यांनी सल्ला दिला. त्यामुळे आरोपी त्यांच्या अंगावर धावून आले. अश्लील शिवीगाळ करून त्यांनी विजय किशोर शितोळे यांना तसेच त्यांच्या वडिलांना मारहाण केली आणि त्यांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच अजनीचा पोलीस ताफा तेथे पोहोचला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना उपनिरीक्षक फड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहापैकी पाच आरोपींना ताब्यात घेतले. विजय शितोळे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून गुन्हा केल्याबद्दल तसेच साथरोग कायद्याचे उल्लंघन करून एकत्रित जमल्याबद्दल उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.