वर्धेत जन्मताच मिळतो ‘आधार’
By admin | Published: May 23, 2017 05:16 PM2017-05-23T17:16:50+5:302017-05-23T17:16:50+5:30
जन्मताच बाळाची आधार नोंदणी करणारे वर्धा रुग्णालय राज्यातील कदाचित पहिलेच रुग्णालय ठरत आहे.
रूपेश खैरी।
वर्धा : जन्माची नोंद करण्याकरिता शासनाच्यावतीने नवजात बालकाची एका महिन्यात आधार नोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र वर्धेत बाळाच्या जन्माच्या काही तासातच आधार नोंदणी होत आहे. जन्मताच बाळाची आधार नोंदणी करणारे वर्धा रुग्णालय राज्यातील कदाचित पहिलेच रुग्णालय ठरत आहे. रुग्णालयात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला येथे येणाऱ्या माता-पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
शासनाच्या आदेशानुसार बालक व त्याच्या पालकांना रुग्णालयातून बाहेर गेल्यानंतर आधार नोंदणीकरिता इतरत्र भटकावे लागणार नाही, याची दक्षता घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांची आधार नोंदणी करणे सुरू केली आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. महिलेची प्रसूती झाल्याच्या काही तासातच तो या बालकाची नोंद घेवून त्याची माहिती नियमानुसार आॅनलाईन पाठविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. नोंदणी झाल्यानंतर त्या चिमुकल्याचे आधार कार्ड त्याच्या घरच्या पत्त्यावर डाक विभागाच्या माध्यमातून पोहोचविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
शासनाच्यावतीने सर्वांनाच आधार कार्ड अनिवार्य केले आहे. प्रत्येक योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि स्वत:ची ओळख दर्शविण्याकरिता आधार कार्ड महत्त्वाचे ठरत आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेला हा उपक्रम येथे प्रसूतिकरिता येत असलेल्या सर्वसामान्यांना आधाराचाच ठरत आहे. वर्धेतील हा उपक्रम राज्याकरिता पायलट प्रोजेक्ट ठरणारा आहे.